बीड –
माजी मंत्री असलेले आणि सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी तत्कालीन मंत्री मंडळात मंत्री असताना त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली असल्याचे समोर आले असून आमदार सुरेश धस यांनी हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी केला आहे
.आमदार धस यांचा जामगाव रोडवरील बंगलाच जवळपास 60 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप राम खाडे यांनी केला आहे.आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आष्टी तालुक्यातील इनामी जमिनी आपल्या मालकीच्या करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराखाली ही माहिती उघड झाली आहे. आष्टी येथील देवस्थाने आणि मशिदीच्या इनाम जमिनींमध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून आणि महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे जवळपास हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या गैर व्यवहारांमध्ये मच्छिंद्र मल्टीस्टेट कॉ. क्रेडिट सोसायटीचे, आयसीआयसीआय बँकेचे डीडी वापरण्यात आले आहेत. सुरेश धस हे मल्टीस्टेट कॉ. चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी या कार्यकारी संचालिका आहेत.विविध देवस्थानांच्या तब्बल ४५९ एकर जमीन लाटल्याचा ठपका धस यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तसेच जमिनीच्या व्यवहारात शासनाचा महसूल बुडवण्यात आला असून सामान्य माणसाची फसवणूक केल्याचाही आरोप राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी केला आहे