ब्रिटन –
जगात कोविड-19 चा कहर अद्याप थांबलेला नाही, तर आणखी एका व्हायरसचा शोध लागल्याने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये ३ जणांना लासा विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले असून त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी हा विषाणू काही आफ्रिकन देशांपुरता मर्यादित होता, मात्र ब्रिटनमध्ये पोहोचल्यानंतर इतर देशांमध्ये पसरण्याची शक्यता वाढली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विषाणूची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, आतापर्यंत या विषाणूवर इलाज मिळालेला नाही
तज्ज्ञांच्या मते, लस्सा विषाणू उंदरांपासून मानवांमध्ये पसरतो. म्हणूनच लोकांनी विशेष काळजी घ्यावी आणि उंदरांच्या संपर्कात येऊ नये. त्याची सुरुवातीची लक्षणे म्हणजे ताप,थकवा, डोकेदुखी, पाठदुखी, छातीत दुखणे, ओटीपोटात दुखणे इत्यादी, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणे उशिरा दिसून येतात आणि लोकांची स्थिती गंभीर होते. या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे ही दिलासादायक बाब असली तरी काही रुग्णांमध्ये गुंतागुंत
वाढते आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो.