अहमदनगर दि. १७ मार्च – (सुशील थोरात)
‘ताबा’ हा शब्द सध्या अहमदनगर शहरामध्ये चांगलाच चर्चेत आला आहे ताबा मारणे म्हणजे दुसऱ्याच्या जागेवर जाऊन बळजबरीने आपला हक्क गाजवणे म्हणजेच ‘ताबा’ मारणे.
सर्व सामान्य माणसाला ताबा हा शब्द कधी ठाऊकही नसेल मात्र आता त्यात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात हा ताबा शब्द आल्याने सर्वसामान्य माणसाचे जीवन दुःखी झाले आहे.मोठ्या कष्टाने राबराब राबून मुलाबाळांसाठी भविष्याचा विचार करून खरेदी केलेल्या मोकळ्या प्लॉट वर एखादा अनोळखी माणूस येऊन हक्क दाखवतो तेव्हा त्या माणसाला ताबा या शब्दाचा अर्थ कळतो आणि तो माणूस तिथेच संपलेला असतो
‘ताबा’ मारण्याचे अनेक प्रकरणं सध्या अहमदनगर शहरामध्ये सुरू असून मात्र काही अपवाद वगळता सर्व प्रकरणे हे बाहेरच्या बाहेर मिटवले जातात आणि त्यामुळे या ताबा मारणाऱ्यांची हिम्मत वाढत आहे.
अहमदनगर शहर आता चारी बाजूंनी वाढत चालले आहे केडगाव परिसर,बुरुडगाव रोड परिसर,सारसनागर परिसर, मुकुंदनगर, तपोवन रोड, बोल्हेगाव ,औरंगबाद रोड अशा विविध परिसरात जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. उंच उंच इमारती तसेच रोहौसिंग नवीन बंगले यांची बांधकामे रात्रंदिवस सुरू असल्याने हे सिमेंटचे जंगल मोठ्या प्रमाणात वाढत आहेत कधी काळी शेकडो रुपयांना घेतलेल्या जागेची किंमत लाखो करोडो झाल्याने काही टोळ्यांनी नवीन धंदा सुरू केला असून अचानक पणे जमिनीचा भाव वाढला असल्याने अनेक सराईत गुंडांच्या टोळ्या दुसऱ्यांच्या जागेवर जाऊन अतिक्रमण करून ताबा मिळवतात आणि मग त्या अतिक्रमण काढण्यासाठी काही रुपयांची मागणी जागेच्या मालकाकडे ठेवली जाते.
भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीप्रमाणे अखेर तो मालक तडजोड करून काही रक्कम देतो आणि आपली जागा सोडून घेतो असे अनेक प्रकार नगर शहरात सुरू असून हा ‘ताबा’ प्रकार अहमदनगर शहरात एक दिवशी मोठी घटना घडवून आणणार आहे.
अनेक ठिकाणी या ताब्यां वरून वाद-विवाद होतात मात्र स्थानिक राजकीय पाठबळ असल्याने हे वाद जागेवर सोडवले जातात एखादी जागा शोधून त्या ठिकाणी पद्धतशीरपणे प्लॅनिंग करून अतिक्रमण केले जाते आणि जागा मालकाकडून पैसे घेतले जातात असे प्रकार नगर शहरात सर्व परिसरात घडत असून हे प्रकार थांबले नाहीत किंवा थांबवले नाहीत तर एखाद्याचा जीवही या ताबा प्रकरणातून जावू शकतो.
या ताबा मिळवणाऱ्या गुंडांच्या मागे नेमकं कोणाचं पाठबळ आहे हे पाहणेही गरजेचे आहे. जोपर्यंत पोलिसांपर्यंत गोष्ट जात नाही तोपर्यंत पोलिसही या प्रकरणात काही करू शकत नाहीत त्यामुळे या गुंडांचा सध्या फावलं जातय सर्वसाधारण माणूस पोलीस आणि गुंडांच्या नदी न लागता पैसे देऊन आपली मान मोकळी करत असल्याने दिवसेंदिवस ताब्याचेप्रकार वाढत आहे.
विशेष म्हणजे एखाद्या सामान्य माणसाच्या जागेवर एखाद्या टोळीने किंवा गुंडाने ताबा घेतल्यानंतर तो ताबा काढण्यासाठी काही टोळ्याही सक्रिय असतात मूळ मालकाकडून कमी किमतीत जागा घेऊन नंतर ही टोळी ताबा मारणाऱ्या माणसाला हाकलून लावते आणि जागा विक्री करते असे प्रकार नगर शहरात घडत आहेत.
ताबा मारल्यानंतर त्या जागेची किंमत कमी होते कारण दुसरा सर्वसामान्य माणूस ही जागा घेण्याची हिम्मत करत नाही त्यामुळे कवडीमोल किंमत देऊन जागा खरेदी करून ती करोडो रुपयांना विकण्याचा धंदा करण्यात काही टोळ्या सध्या नगर शहारत सक्रिय झाल्या आहेत.