अहमदनगर दि.१६ डिसेंबर
अहमदनगर शहरात खड्ड्यांचे शहर म्हणून अनेक वेळा चर्चा झाली आहे मात्र ही खड्डे बुजवण्याचे काम अद्यापही संथगतीने शहरामध्ये सुरू असल्याचे दिसते. शहरात सुरू असलेल्या काही विकासकामांमुळे अनेक ठिकाणे खड्डे खांदून ठेवलेले आहेत. मात्र ही कामे लवकर होत नसल्याने अनेक दिवस या खड्ड्यांवरून नगरकरांना प्रवास करावा लागतो त्यामुळे अनेक नागरिकांना धुळीमुळे आणि खड्ड्यांमुळे अनेक व्याधी जडलेल्या आहेत मात्र तरीही महानगरपालिका प्रशासन याबाबत गंभीरपणे विचार करत नाही।त्यामुळे सहनशील नगरकरांनी आता पुण्यासारख्या पाट्या लावून अहमदनगर महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी पाट्यांची शक्कल लढविण्यात सुरुवात केली आहे. दिल्ली गेट येथे मोफत धूळ खायला मिळेल अशी पाटी मध्यंतरी खूप चर्चेचा विषय झाली होती त्यानंतर आता सध्या तेलिखुंत येथील एका खड्ड्यात समोर एक पाटी लावलेली असून ही पाटी सध्या नगर शहरात एक चर्चेचा विषय बनली आहे.
अहमदनगर महानगरपालिकेत ठेकेदारांच्या संपामुळे मध्यंतरी काही काळ महानगरपालिकेचे सर्व विकासकामे ठप्प होती. ठेकेदारांना कामाची बिले मिळत नसल्याने त्यांनी काम बंद आंदोलन केले होते महानगरपालिकेची वसुली झाली तरच विकास होऊ शकतो मात्र वसुलीकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सक्तीने वसुली करणे आणि राजकीय हस्तक्षेप न करता वसुली झाली तर महानगरपालिकेची आर्थिक घडी बसण्यास वेळ लागणार नाही.