अहमदनगर प्रतिनिधी
सारसनगरमध्ये सुरू असलेले टॅँकर बंद झाले असून नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळत आहे. शहरातील ज्या भागाला टॅँकरने पाणी सुरू आहे, ते बंद करून प्रत्येकाला नळाचे पाणी मिळणार आहे. त्यादृष्टीने फेज २ पाणी योजनेचे काम सुरू असून शहर टॅँकरमुक्त करण्याची घोषणा आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी केली. शहर विकासाचे नियोजन सुरू असून पुढील पन्नास वषार्चा विचार करून कायमस्वरूपी विकासाचे प्रश्न मार्गी लावले जात आहे. प्रलंबित प्रश्न, समस्या एकेक करून सोडविल्या जात आहेत. फेज टू पाणी योजना व अमृत पाणी योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यातून शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे आ.संग्रामभैय्या जगताप म्हणाले. नगर शहरामध्ये काही भागांमध्ये टँकर सुरू आहे प्रत्येक कुटुंबीयांना नाळाद्वारे पाणी देण्याचा मानस असून लवकरच नगर शहर टँकर मुक्त करणार असल्याचे ते म्हणाले. सारसनगर राजमाता कॉलनी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले,नगरसेवक प्रकाश भागानगरे,मा.नगरसेवक संजय चोपडा,गौरव शिंदे, सतीश वारुळे, दादाभाऊ बोरुडे,ज्ञानेश्वर फुंदे,डॉ.चहाळ,रुपेश पवार, भूषण शिंदे,दिनेश उरमुडे,विद्या तन्वर,आशा वांडेकर,स्मिता वरुळे,मनीषा शिंदे, नंदा गर्जे उपस्थित होते.
सारसनगर आता टँकर मुक्त झाले आहे. स्वच्छतेचाही प्रश्नही मार्गी लागून शहर कचराकुंडी मुक्त झाली आहे. शहरातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी स्वत:च्या हक्काचे व्यासपीठ असावे या दृष्टिकोनातून नाट्य संकुलाचे काम देखील सुरु आहे. तसेच मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या माध्यमातून सुरु असलेली मोफत आरोग्य सेवा अखंडितपणे सुरू राहावी यासाठी अत्याधुनिक रुग्णालय व्हावे, यासाठी निधी प्राप्त झालेला आहे. शहरातील पथदिव्यांचा देखील प्रश्न लवकरच मार्गी लागेल.- संग्राम जगताप,आमदार
अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना आमदार संग्राम जगताप यांनी चालना दिली आहे. आपल्याला मूलभूत प्रश्नापासून कामे करावी लागत आहे. कायमस्वरूपी विकासाचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून विकासाची पावले उचलली आहे. सारसनगरचा विकास कामातून कायापालट केला आहे.- गणेश भोसले, उपमहापौर
आमदार अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सारसनगर भागाची विकास कामातून ओळख निर्माण करून दिली आहे. या भागांमध्ये काटेरी जंगल होते. आता विकसित परिसर म्हणून सारसनगरची ओळख निर्माण झाली.पूर्वी सारसनगरला पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा होत होता, परंतु आता प्रत्येकाला नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. भिंगार नाल्यावर दोन ठिकाणी पुलाचे कामे मार्गी लावले आहेत. आता रस्त्यांची कामे देखील सुरू होणार असून त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न ही मार्गी लागेल.- प्रकाश भागानगरे, नगरसेवक.