बीड – दि.१८ डिसेंबर
बीड जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु विभागातील एक नंबरच्या वॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन धूर येऊ लागला. त्या ठिकाणी कामावर असलेल्या अनिता मुंडे व पुष्पा माने या दोघी परीचारिकांनी तात्काळ, धूर निघणारा वॉर्मर व इतर सर्व १३ वॉर्मरचा वीज पुरवठा खंडित केला. वॉर्मरमधील बालकांना इतरत्र हलवले. हा प्रकार बुधवारी सायंकाळ दरम्यान घडला.परिचरिकांच्या सतर्कतेमुळे बीडचे अहमदनगर होता होता वाचले.जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयु वार्डातील एका वॉर्मरमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच परिचारिका अनिता मुंडे यांनी पुष्पा माने यांना ही बाब लक्षात आणून देऊन तात्काळ त्या ठिकाणी असलेल्या बाळाला उचलले तर पुष्पा माने यांनी लाईट पुरवठा बंद करून इतर बारा बालकांना सुरक्षितस्थळी नेले. तसेच दोघींनी तात्काळ वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती दिली. या एसएनसीयु विभागात एसी आणि ऑक्सिजन पुरवठा, लाईट असल्याने मोठी दुर्घटना घडली असती. मात्र सुदैवाने नर्सच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सहा नोव्हेंबर रोजी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात अशाच छोट्याशा शॉर्टसर्किटमुळे भयानक आग लागून चौदा रुग्णांचा मृत्यू झाला होता मात्र समयसूचकते मुळे बीड येथे बालकांचे प्राण वाचले आहेत.