अहमदनगर .दि.१९ डिसेंबर
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील पोटनिवडणूक मध्ये अद्यापही रंग चढलेला दिसत नाही. महाविकास आघाडी आणि भाजपा, मनसे या तीन पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह दोन अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रभाग अत्यंत मोठा असल्याने आणि पोटनिवडणुकीमध्ये आतापर्यंतचा इतिहास पाहता मतदार मतदानासाठी जास्त करून बाहेर पडत नाहीत त्यामुळे सध्या उमेदवारांसमोर मतदार कसे बाहेर काढायचे याची काळजी लागून आहे. महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी प्रचार रॅली काढून प्रचार करतानाचे चित्र या प्रभागात दिसत आहेत. तर मनसेचे स्थानिक नेते अद्यापही या प्रचारात उतरले नाहीत भाजप कडून प्रदीप परदेशी यांच्यासाठी खासदार सुजय विखे यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर भाजपमध्ये सर्वच शांतता दिसून येत आहे. या प्रभागाचे गणित पाहता भविष्यात कोण कोणाला डोईजड राहणार यावरच सर्व निवडणुका अवलंबून आहे.भविष्यात प्रभागांची फेररचना होणार आहे त्यामुळे या निवडणुकीत पुढील रणनीती बघूनच स्थानिक नेत्यांनी कोणाला मदत करायची अशी रणनीती आखली आहे. कारण दोन वर्षानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला कोणी डोईजड होऊ नये म्हणून स्थानिक नेते आपल्या पद्धतीने राजकारण करत असल्याचे चित्र या प्रभागात दिसून आले आहे. काही स्थानिक नेत्यांची बैठक होऊन पुढील निवडणुकी बाबत विचारमंथन करून कोणाला कसा फायदा तोटा होईल याचे गणित पाहून कोण डोईजड होईल आणि कोण सॉफ्ट राहील यावर विचारमंथन करून निवडणुकीत कोणाला मदत करायची याची रणनीती आखली गेल्याची चर्चा सध्या या प्रभागात सुरू आहे.तर निवडणूक म्हटलं की लक्ष्मी दर्शन हे गणित ठरलेलं असताना या निवडणुकी मध्ये लक्ष्मी दर्शन कधी होईल याची वाट काही जण पाहत आहेत. मतदान काही तासांवर आले असताना या प्रभागात मात्र शांतता दिसत असली तरी रात्र वैऱ्याची असते त्यामुळे आता शेवटच्या काही तासांमध्ये या प्रभागात चांगलीच हालचाल होण्याची चिन्हे आहेत.





