अहमदनगर दि.१३ डिसेंबर (सुथो)
प्रभाग क्रमांक ९ (क) ची पोटनिवडणूक आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून उमेदवारांना चिन्हासह अनुक्रमांक मिळाले आहेत या प्रभागात सहा उमेदवार आपले नशीब अजमवणार आहेत.प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या वतीने प्रदीप परदेशी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर शिवसेना राष्ट्रवादी आघाडी कडून सुरेश तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेच्या वतीने पोपट पाथरे तर अजय साळवे आणि ऋषीकेश गुंडला, संदिप वाघमारे हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूकी मध्ये चांगलीच रंगत अली आहे. प्रदीप परदेशी सुरेश तिवारी आणि पोपट पाथरे हे मागील निवडणुकीमध्ये सुद्धा उभे होते मात्र श्रीपाद छिंदम यांनी बाजी मारत या सर्वांचा पराभव केला होता यावेळेस छिंदम उमेदवार म्हणून नसला तरी ऋषिकेश गुंडला यांच्यामुळे या निवडणुकीत चांगली रंगत आली आहे. या प्रभागात एकूण १८,३०४ मतदार असून पुरुष मते ९१९९ तर महिलांची ९१०५ मते आहेत.या प्रभागातील तोफखाना आणि सर्जेपुरा,सिध्दार्त नगर ओरिसरतील मते निर्णायक ठरू शकतात मागील निवडणुकीमध्ये तोफखाना परिसरातील मतदारांसह इतरांनी श्रीपाद छिंदम यांना साथ दिल्याने त्यांचे पारडे जड होते. या प्रभागात सर्जेपुर मधील काही भाग येतो त्या ठिकाणच्या कोणीही उमेदवार निवडणुकीत उभा नाही .त्या ठिकाणचे मतदान निवडणुकीला कलाटणी देऊ शकते.
यावेळेस सर्जेपुर,बागडपट्टी आणि त्या परिसरातील काही भागांच्या मतांवर या निवडणुकीचा निकाल ठरू शकतो. तर या प्रभागात निवडणुकीसाठी असलेले सहा पैकी चार उमेदवार एकाच परिसरात राहतात तर दोन उमेदवार एका ठिकाणी राहतात याचा परिणामही निवडणुकीवर जाणवू शकतो.थेट महावीर नगर पासून ते सर्जेपुर पर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे. मागील निवडणुकीचा इतिहास पाहता ११ हजार २२९ एकूण मतदान होते.श्रीपाद छिंदम यांना ४५३२ मतं मिळाली होती.तर दुसऱ्या स्थानावर भाजपच्या प्रदीप परदेशींना २५६१मतं मिळाली. शिवसेनेच्या सुरेश तिवारींना १६२३ मतं, मनसेच्या पोपट पाथरे यांना १४२५, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अनिता राठोड यांना फक्त ७१५ मतं मिळाली होती. या प्रभागात सध्या काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले आहे तर एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला होता. आता राजकीय समीकरण पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीने कॉंग्रेस पक्षाला निवडणुकीपासून दूर ठेवत आपली वेगळी चूल मांडली आहे.असं दिसतं असलं तरी कांग्रेसच्या काही नेत्यांचे फोटो शिवसेना राष्ट्रवादीच्या प्रचार पत्रकावर आहेत .त्या मुळे काँग्रेसची भूमिका अद्याप समोर आली नसली तरी ऐनवेळी काँग्रेस काय भूमिका घेणार या कडे सर्वच उमेदवारांची नजर असणार आहे.भाजपची नेतेमंडळी या निवडणुकीत किती रस घेतात यावर निकाल अवलंबून राहील. मनसेच्या पोपट पाथरे यांना मनसेच्या नेत्यांची साथ मिळणार का?आणि अपक्ष अजय साळवे आणि संदीप वाघमारे यांचा करिश्मा कुठपर्यंत चालू शकणार यावरच निवडणूकीची अंतीम चित्र राहणार आहे.सध्यातरी मतदार प्रतीक्षेत आहेत उमेदवार आपल्या भेटीला कधी येतील.शहरातील एकंदर राजकारण पाहता आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे पाहता शिवसेनेला याचा फायदा होऊ शकतो मात्र भाजपची पक्की मते आणि प्रदीप परदेशी यांचा वैयक्तिक जनसंपर्क यावर तेही विजय खेचून आणू शकतात त्यामुळे आता शेवटपर्यंत या निवडणुकीत चुरस राहणार आहे.