जामखेड – दि. १३ डिसेंबर नासीर प
आगामी काळात येऊ शकणार्या संभाव्य कोरोना लाटांचा धोका टाळण्यासाठी जामखेड पंचायत समितीच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत असून त्यानुसार १२ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत प्रथम लसीकरण करून घेणाऱ्यांना (फक्त पहिला डोस) ही संधी उपलब्ध असणार आहे अशी माहिती गटविकासधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागाचे ७२ टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. परंतु अद्यापही २६ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लस घेण्याबाबत गैरसमज दिसून येतात. प्रशासन लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मात्र त्याला हवे तेवढे यश मिळत नाही. त्यामुळे पंचायत समिती जामखेडच्या वतीने १००% लसीकरण होण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार ज्या नागरीकांचा लसीचा पहिला डोस राहिलेला आहे त्यांनी लस घेतल्यास त्यांना टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, कुकर, मिक्सर, पंखा अशी जवळपास ७० बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.
जामखेड पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांनी लोकसहभागातून ही बक्षीस योजना सादर केलेली आहे. दि. १ जानेवारी २०२२ रोजी पंचायत समिती जामखेड येथे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या लकी ड्रॉ स्पर्धेची सोडत काढण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात येईल. या बक्षीस योजने नुसार खालील बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम- फ्रीज, द्वितीय- पिठाची गिरणी, तृतीय- LED TV, चतुर्थ- ५ पंखे, व पाचवे-५ मिक्सर, सहावे-५ कुकर, सातवे-५ इस्त्री, आठवे-२० टिफिन अशी एकूण ४३ बक्षिसे वाटप करण्यात येणार आहेत.