अहमदनगर दि.१३ जानेवारी
मकर संक्रांत एका दिवसावर येऊन ठेपली असतानाच पतंग उत्सव जोरात सुरू झाला आहे. मकरसंक्रांतीच्या आधीच काही दिवसांपासून नगर शहरात पतंगबाजी सुरू होते मात्र या पतंगबाजी मध्ये नायलॉन मांजाचा वापर सर्रास होत असून महानगरपालिकेने काही पतंग मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नोटीस बजावून नायलॉन मांजा विक्री करू नये असे बजावले असतानाही या मांजाची सर्रास विक्री होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे काही कोडवर्ड वापरून दुकानात नव्हे तर घरामध्ये नायलॉन मांजा विक्री होत आहे. मांजा घेण्यासाठी गिऱ्हाईक दुकानात आल्यानंतर त्याने नायलॉन मांजाची मागणी केल्यानंतर काही ठराविक कोडवर्ड सांगून त्या गिऱ्हाईकला विक्रेत्याच्या घरापर्यंत अथवा गोडाउन पर्यंत पाठवले जाते तेथे कोडवर्डची खात्री झाल्यानंतरच नायलॉन मांजा त्या ग्राहकाच्या ताब्यात दिला जातो.
असे प्रकार नगर शहरात होत असून याबाबत महानगरपालिका अथवा पोलिस प्रशासन खरंच अनभिज्ञ आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. नायलॉन मांजा हा मानवासह पशुपक्ष्यांसाठी मोठा घातक आहे मात्र तरीही स्वतःच्या काही आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिक नायलॉन मांजाच्या विक्री करताना आढळून येत आहे.