अहमदनगर – दि.१४ डिसेंबर (सुथो)
अहमदनगर महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक ९(क) या प्रभागाची पोटनिवडणूक काही ना काही कारणामुळे चांगलीच चर्चेत येत आहे.या निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून माजी उपमहापौर ज्यांच्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक लागली असे श्रीपाद छिंदम यांचा निवडणूक स्थगितीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तर आज महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांची प्रचार रॅली शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांबरोबर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरेश तिवारी यांचे प्रचार पत्रक मतदारांना वाटण्यात आले. या प्रचार पत्रकावर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची फोटो छापलेले आहेत. अगदी शरद पवारांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच स्थानिक आमदार, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आजी माजी नगरसेवक आणि विशेष म्हणजे ज्या प्रभागाची निवडणूक आहे त्या प्रभागातील काँग्रेसचे आजी माजी नगरसेवकांचे फोटो या प्रचार पत्रकावर आहेत. मात्र काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे यांना या निवडणूक प्रचार पत्रकावर स्थान देण्यात आलेले नाही. प्रचार फेरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी फिरत असताना अपवाद वगळता काँग्रेसचा एकही पदाधिकारी दिसला नाही.
आणि प्रचार पत्रकारावर तर थेट शहर जिल्हाध्यक्ष यांचा फोटोच गायब असल्याने आघाडीत बिघाडी आहे हे समोर आले आहे. किरण काळे यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर शिवसेनेचे शहर मुख्यलय असलेल्या शिवालय येचे जाऊन स्वर्गीय अनिल राठोड यांच्या तैल चित्राचे दर्शन घेत त्यांच्याच प्रेरणेने आणि त्यांच्याच मार्गाने आपण इथून पुढे राजकारण करणार असल्याचे सांगितले होतं. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिस अधीक्षकांना भेटून हा राजकीय गुन्हा असून त्याबाबत चौकशी करून कारवाई करावी असे निवेदन दिले होते. त्याच शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार पत्रकावरून किरण काळे हे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असतानाही त्यांचा फोटो गायब करण्यात आला हे विशेष. या पत्रकावरून आता नगर शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.