परळी
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजीमंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना एक पत्र लिहीले आहे. १२ डिसेंबर आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही. गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्याच वेळी १२ डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. हा संकल्प पूर्ण करणार का असा सवाल त्यांनी या पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे. मात्र हा संकल्प नेमका काय असणार हे या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या या नव्या संकल्पाबाबत कार्यकर्त्यांसह सर्वांनाच उत्सुकता आहे..