अहमदनगर दि.६ जानेवारी
मंगळवारी सकाळी अमरधाम मधील विद्युत दाहिनी जवळ उंचावर एक पक्षी नायलॉन मांजात अडकला असल्याचे काही जणांनी मंदार साबळे यांना कळवले.साबळे यांनी महापालिकेचे शशिकांत नजाण यांना या बाबत माहिती देऊन त्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना पाठवावे असे सांगितले. या विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनीही तातडीने त्या ठिकाणी कर्मचारी पाठवले व या पक्षाची सुटका केली. साबळे यांनी आजवर आशा मांजात अडकलेल्या अनेक पक्षांची सुटका केली आहे. त्यांना अनेकदा महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे मोलाचे सहकार्य यात मिळाले आहे.
देशात नायलॉन मांजाच्या वापर व विक्रीवर बंदी असतानाही चोरी छुपे हा मांजा विकला जातो.विक्रेत्यांवर दरवर्षी जुजबी कारवाई केली जाते.मात्र त्याचा वापर करणारे यातून सुटतात. हा मांजा पर्यावरणास घातक आहे. या मुळे आत्तापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या मांजात पंख अडकून दरवर्षी हजारो पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. शासन काय संपूर्ण पक्षी सृष्टी या मांजामुळे नामशेष झाल्यावर ठोस कारवाई करणार का असा संतप्त सवाल निसर्ग अभ्यासक मंदार साबळे यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी, आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व वन विभागाने एकत्रितपणे या विषयात लक्ष घालून तातडीने विक्रेते व संक्रांतीला हा मांजा वापरणारे या सर्वांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नेचर लव्हर्स क्लब च्या माध्यमातून करण्यात आली आहे .
हा मांजा दरवर्षी शहरात कुठून येतो त्याचाही तपास करून त्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात यावी. मांजा न वापरण्याबाबत समाज प्रबोधन करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आशा विक्रेत्यांच्या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा व अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणीही संस्थेचे सचिव नितीन थोरात व साबळे यांनी केली आहे.