अहिल्यानगर
नगर शहरातील पाच डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता या डॉक्टरांसह कोरोना काळात नगर शहरात कोविड सेंटरला परवानगी दिली होती त्या कोविड सेंटरवर आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. कोरोना काळामध्ये ज्या काही कोविड सेंटरला परवानगी दिली होती आणि परवानगी देणारे आरोग्य अधिकारी आणि कोविड सेंटर चालवणाऱ्या त्या डॉक्टरांवर आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवद्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
काका शेळके यांनी यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन याबाबत गुन्हे दाखल करावे अशी मागणी केलेली आहे. मागील आठवड्यात नगर शहरातील पाच डॉक्टरांवर औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गंभीर गुन्हे दाखल झाले असून यामध्ये कोविड सेंटर चालवणारे काही डॉक्टर आरोपी झालेले आहेत. त्या कोविड सेंटरला जर आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसती तर आज कित्येक लोकांचे जीव वाचले असते. त्यामुळे करोना काळामध्ये ज्या ज्या कोविड सेंटरला त्या काळातील महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी त्यांच्या स्वतःच्या अधिकारांमध्ये व कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची सही न घेता त्या कोविड सेंटरला परवानगी दिली गेली व त्या काळामध्ये ज्या ज्या कोविड सेंटरमध्ये गोरगरीब नागरिकांचे नातेवाईक मयत झालेले आहेत, त्या सर्व मयत झालेल्या लोकांची जबाबदारी आरोग्य अधिकारी तसेच जे जे कोविड सेंटरचे दवाखाने व त्यांचे डॉक्टर त्यांच्यावर ठेवून मनुष्यवद्याचा गुन्हा दाखल करावा. महानगर पालिका प्रशासन जर गुन्हा दाखल करत नसेल तर मला फौजदारी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी काका शेळके यांनी केली आहे.





