अहिल्यानगर दिनांक २३ डिसेंबर
अवैध धंद्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार ऊर्फ गामा भागानगरे या तरुणाची १९ जून रोजी रात्री तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना घडल्यानंतर तिन्ही हल्लेखोर नगरमधून पसार झाले होते. दरम्यान, २३ जून ला पहाटे गणेश केराप्पा हुच्चे आणि नंदू बोराटे या दोघांना एलसीबीच्या पथकाने पुणे रेल्वेस्थानक येथून ताब्यात घेतले होते तर तिसरा आरोपी संदीप गुडा यास पोलिसांनी नंतर अटक केली होती.

ओंकार भागानगरे या तरुणाच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. मयत ओंकार भागानगरे आणि ओंकार घोलप यांनी अवैध धंद्यांची तक्रार केल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात हुच्चे, भागानगरे, घोलप यांच्यात वाद झाले. हुच्चे याने पोलिसांसमोरच घोलप व भागानगरे या दोघांना धमकी दिली होती. त्यानंतर सुमारे आठ ते नऊ तासांनी रात्री एक वाजता बालिकाश्रम रस्त्यावर ओंकार भागानगरे, ओंकार घोलप, शुभम पडोळे, आदित्य खरमाळे यांच्यावर तलवारीने खुनी हल्ला झाला होता. तिघांनी केलेल्या हल्ल्यात ओंकार भागानगरे यांचा खून झाला होता. तर, शुभम पडोळे गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी ओंकार घोलप यांच्या फिर्यादीवरून गणेश हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा या तिघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालयात सुरू झाली असून आज सुनावणीचा दुसरा दिवस होता या सुनावणी दरम्यान त्या रात्री नेमकं काय घडले या बाबतचे सीसीटीव्ही फुटेज मधील एक व्हिडिओ न्यायालयात पुरावा म्हणून दाखवण्यात आला.तर या प्रकरणाची पुढची सुनावणी २९ डिसेंबर रोजी होणार आहे.आरोपींच्या वतीने ॲड. महेश तवले, ॲड. गुगळे, ॲड. फळे काम पाहत आहेत.





