अहिल्यानगर दिनांक 24 डिसेंबर
महानगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामाला सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छूकांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे चित्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये दिसून आले. पहिल्या दिवशी मंगळवारी (दि. २३) तब्बल 653 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून आजही अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतलेआहेत.प्रभाग 5 (ब) मधून माजी नगरसेवक भाजपाचे ॲड. धनंजय जाधव यांनी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत खाते खोलले आहे.

महापालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मंगळवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज वाटप व दाखल करण्यास सुरूवात झाली. या निवडणुकीसाठी महापालिका क्षेत्रातील 17 प्रभागांकरीता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे साधारणत: तीन प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २ जानेवारीला उमेवारी अर्ज माघारीची मुदत असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सुमारे अडीच हजारांहून अधिक इच्छूक उमेदवार गुडघ्याला बाशींग बांधून तयार आहेत. महायुती मधील भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस कडे सर्वाधिक इच्छूक आहेत. महाविकास आघाडी मधील शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, मनसे मध्ये सुधा अनेक जण निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत.





