अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचा भगवी टोपी आणि भगवा पंचा परिधान केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोखाली ‘इतिहासही नोंद घेईल असा भगवाधारी एकमेव आमदार’ असे स्लोगन लिहिण्यात आले असून, या फोटोची समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
भगवी टोपी आणि भगवा पंचा आमदार संग्राम जगताप यांनी आज घेतला नाही विधान सभा निवडणुकीनंतर आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे मात्र सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे जोरात वाहत असून आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिमंडळात संधी भेटेल अशी शक्यता आहे त्यामुळे या फोटोवर चांगली चर्चा सुरू आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. अनेकांच्या व्हॉट्सॲप डीपीवरही हा फोटो झळकत असल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात या छायाचित्राची चर्चा रंगू लागली आहे.
कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे चर्चेला नवे वळण!
आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहराचे आमदार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भगव्या पेहरावातील हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. फोटोखालील घोषवाक्यामुळेही समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
आगामी काळात आमदार संग्राम जगताप यांच्या राजकीय भूमिकेत काही बदल होणार का? त्यांच्या सध्याच्या पक्षीय भूमिकेबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरील सक्रियतेला भविष्यात कोणते राजकीय वळण मिळणार, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
राजकीय वर्तुळाचे लक्ष आगामी भूमिकेकडे!
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आणि त्याला मिळणारा प्रतिसाद यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, या फोटोवरून त्यांच्या भविष्यातील राजकीय निर्णयाबाबत कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. पक्षबदल किंवा अन्य राजकीय निर्णयाबाबत आमदार जगताप यांच्याकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्यास, या चर्चांना अद्याप तर्कवितर्कांचेच स्वरूप आहे.
त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे लागले असून, सोशल मीडियावरील भगव्या छायाचित्राने अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय दिला आहे.



