Homeराजकारणआम्ही सेनेचा भगवा खांद्यावर घेतला तेव्हा "बाळराजे" तुम्ही काॅग्रेसच्या पाळण्यात खेळत होतात...

आम्ही सेनेचा भगवा खांद्यावर घेतला तेव्हा “बाळराजे” तुम्ही काॅग्रेसच्या पाळण्यात खेळत होतात – भिंगार शिवसेनाप्रमुख सुनिल लालबोंद्रे यांचा पलटवार

advertisement

भिंगार दि.१ ऑगस्ट –

शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हाच आम्ही सेनेचा भगवा खांद्यावर घेतला. आम्ही सेनेचा भगवा खांद्यावर घेतला तेव्हा बाळराजे तुम्ही काॅग्रेसच्या पाळण्यात खेळत होतात, या वस्तुस्थितीवर बोट ठेवत भिंगार शिवसेनाप्रमुख सुनिल लालबोंद्रे यांनी नगर शहराध्यक्ष संभाजीराजे कदम यांच्यावर पलटवार केला.

सुनिल लालबोंद्रे पुढे म्हणाले, आम्ही प्रथमपासून आजतागायत भगव्याशी एकनिष्ठ राहिलो आहोत. कोणत्याही निवडणूकीत आम्ही कोणीही भगव्याशी बेईमानी केली नाही. शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री स्व. अनिलभैय्या राठोड हे नगरकरांच्या ह्रदयावर २५ वर्षे अधिराज्य करत असताना आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे होतो हे नगरकर अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे अनिलभैय्यांचे खरे वारसदार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे पहाताना नगरकरांचे मनोरंजन होते आहे. अशा कृत्याने ‘ते’ स्वतःचे हसे करून घेत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत अनिलभैय्यांना आम्ही भिंगारमधून मतांचा जो लीड मिळवून दिला तो नगर शिवसेना शहराध्यक्षाचा टेंभा मिरवणारेंनी स्वतःच्या वाॅर्डमध्ये का मिळवून दिला नाही? त्या निवडणूक निकालाची वाॅर्डनिहाय झालेली मतमोजणी आजही समोर ठेवली तर अनिलभैय्यांच्या सोबत असल्याचे भासवत गद्दारी कोणी केली? ते सत्य पहावयास मिळते.

अनिलभैय्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे ‘हे’ निकालानंतर नगर शिवसेना कार्यालयाकडे फिरकण्याचेही धाडस करत नव्हते, हेही नगरकरांनी जवळून पाहिलेच आहे.

सेनेचे पक्षप्रमुख मा.श्री.उध्दवजी ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथग्रहण समारंभ असताना स्वतः अनिलभैय्यांनी तेथे आलेल्या नगर शिवसेना शहराध्यक्षांचा जो पाणउतारा केला तो निवडणूकीत केलेल्या गद्दारीमुळेच ! माळीवाड्यातील मतदारांनी शिवसेनेशी बेईमानी करणारे उघड्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा तोंडात बोट घालत आश्चर्य व्यक्त केले होते. आजही हे मतदार आहेत. त्यामुळे आम्ही अनिलभैय्यांचे वारसदार आणि शिवसेनेचे खंदे समर्थक असे म्हणत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा बालिशपणा थांबवावा.

आम्हाला राजकारणाचा वारसा नाही. आम्ही राजकारणात पाऊल ठेवले ते सेनेचा भगवा खांद्यावर घेऊनच. हा भगवा आमच्या समर्थ खांद्यावरच शोभून दिसतो कारण आम्ही भगव्याशी एकनिष्ठ आहोत. आपल्या घराण्याचा काॅग्रेसचा वारसा सांगण्याची लाज वाटते म्हणून अनिलभैय्यांचे वारसदार म्हणत निष्ठावान शिवसैनिकांना डवचण्याचा प्रयत्न करून स्वतःची फजिती स्वतःच करून घेऊ नका, असा सबुरीचा सल्लाही सुनिल लालबोंद्रे यांनी शिवसेना स्टाईलने दिला.

आपल्या शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणे शहर हिताचे अन् समाज हिताचेच ठरते, त्यावर आक्षेप घेणे म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची माझी झेप नाही. मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले मला पहावत नाही, हे स्वकृतीमधून दाखवून देणे होय, असेही भिंगार शिवसेनाप्रमुख सुनिल लालबोंद्रे यांनी परखडपणे सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular