अहमदनगर दि.२० जून
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते आजपर्यंत सुमारे ८ वर्षांच्या विकासकार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या शहर लोकप्रतिनिधींच्या शहर विकासाचे “संग्रामपर्व” पुस्तकाचे दि.१२ जून रोजी प्रकाशन करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच काँग्रेसने शहर दूरदर्शचे “भकासपर्व” पुस्तक प्रकाशित करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता, हेच का विकासाचे “संग्रामपर्व” ? घोषवाक्यासह “भकासपर्वचे” मुखपृष्ठ काँग्रेसने जारी केले आहे. या मुखपृष्ठाची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, नगरकर जनतेचे नगर शहरावर प्रेम आहे. नगर शहराचा विकास व्हावा ही नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. मात्र दुर्दैवाने नवनितभाई बार्शीकर यांच्यानंतर शहराचा विकास होऊ शकलेला नाही. त्यातच ताबा सम्राट असणाऱ्या काही कार्यसम्राटांनी सर्वच राजकारण आपल्या दावणीला बांधले असल्याचे चित्र शहरात निर्माण केले आहे. मात्र काँग्रेस पक्ष याला अपवाद आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे महत्व फार मोठे आहे आणि तीच भूमिका नगर शहराच्या मस्तवाल नाठाळ सत्ताधाऱ्यांना शहर विकासासाठी ताळ्यावर आणण्यासाठी काँग्रेस निर्भीडपणे बजावत आहे.
त्यामुळेच काँग्रेसने रेटून खोटं बोलणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी आणि त्यांच्यावर शहर विकासासाठी नागरिकांचा दबाव आणि धाक निर्माण करण्यासाठी शहराचे वास्तव मांडणाऱ्या भकासपर्व पुस्तकाची घोषणा केली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सावेडी उपनगरातील रेणावीकर शाळे समोरील खड्डेमय रस्त्याचा फोटो असून त्याखाली हेच का विकासाचे “संग्रामपर्व” ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. हा फोटो प्रातिनिधिक स्वरूपात असून सबंध शहराची व्यथा मांडणारा असल्याचे म्हटले आहे. मुखपृष्ठ फोटो सौजन्य हे शहर विकासासाठी आसुसलेला एक सामान्य, सुशिक्षित, बेरोजगार, जागरूक तरुणाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेसने मुखपृष्ठासह पुस्तकाचे मागील कव्हर पेज देखील जारी केली आहे. यावर आयटी पार्क फसवणूक प्रकरण, ताबा प्रकरणे, कोरोना काळात मनपा हॉस्पिटल अभावी गोरगरीब नागरिकांचे झालेले मृत्यू, खड्ड्यांमध्ये हरवलेले रस्ते, पाण्याचे दुर्भिक्ष, केडगाव हत्याकांड प्रकरण, एसपी ऑफीस हल्ला प्रकरण या मागील ८ वर्षांतील दुर्दशेशी निगडीत असणाऱ्या विविध विषयांचा उल्लेख केला असून ‘आणि बरेच काही…’ असं म्हटले आहे. त्याच बरोबर अहमदनगर शहराच्या खऱ्या विकासासाठी, विकासाचे व्हिजन असणारा, अघोरी विचारांच्या दहशती विरुद्ध लढणारा आणि निर्भीडपणे आवाज उठविणारा एकमेव पक्ष, काँग्रेस पक्ष असे नमूद करण्यात आले असून अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नाव प्रकाशक म्हणून नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे समाज माध्यमांवर काँग्रेसच्या या पुस्तकात अजून काय-काय असणार आहे याबद्दल चांगलीच चर्चा नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, शहराच्या विविध भागातील अनेक नागरिकांनी आपली नावे प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर शहर दुर्दशेचे विविध मुद्दे या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी सुचविले आहेत. आपल्या प्रतिक्रिया देखील त्यांनी नोंदविल्या आहेत. वास्तव मांडणारे फोटो पाठवले आहे. नागरीकांना दहशतीमुळे आपले नाव उघडपणे यात येऊ नये असे जरी वाटत असले तरी देखील नगरकरांची व्यथा मात्र त्यांनी मांडली आहे. किरण काळे म्हणाले की नागरिकांनी उचललेल्या या पहिल्या पाऊलाचे काँग्रेस नक्कीच स्वागत करीत आहे. पुढील आठवड्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.