नगर दिनांक १४ जानेवारी
महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही कारवाई केली आहे. आरोग्य सेवा, सुविधा व कार्यक्रमांबाबत शासनाच्या आरोग्य विभागाकडून दरमहा दिले जाणारे रँकिंग घसरले आहे. याप्रकरणी जबाबदार डॉ. बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु तरी देखील डॉ. बोरगे यांचे वर्तन व कामकाजात सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.राज्य शासनाकडील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या महानगरपालिकांच्या रँकिंगमध्येही सुधारणा झालेली नाही. स्वतःच्या विभागातील कर्मचाऱ्यांवरही त्यांना नियंत्रण ठेवता आलेले नाही. विभाग प्रमुखाची जबाबदारी पार पाडण्यात त्यांनी कसूर केलेला आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केलेले असल्याने महानगरपालिकेची जनमाणसात व शासनस्तरावर प्रतिमा मलिन झालेली आहे. त्यामुळे ७ जानेवारी रोजीच्या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत, डॉ. बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
त्यावर आता डॉ.अनिल बोरगे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिले असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर महत्वाच्या आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग दिले जाते. हे रँकिंग म्हणजे स्पर्धा नसून सदर निर्देशांकानुसार आरोग्य सेवांच्या अद्ययावत परिस्थितीचे महापालिकांना आकलन व्हावे यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना रँकिंग दिले जाते. रँकिंगनुसार कामातील त्रुटी दूर करून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश असतो. ही सर्व प्रक्रिया थेट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग स्तरावर होते. यात रॅंकिग घसरल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे कुठेही नमूद नाही. तरीही या प्रकरणी शासकीय पत्रकाचा चुकीचा अर्थ लावून माझ्यावर केलेली सक्तीच्या रजेवर जाण्याची कारवाई मागे घेऊन शासनाने मला अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये कलम ४५ (४) अन्वये दिलेल्या नेमणूकीनुसार माझे कामकाज करण्यास तात्काळ परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
मात्र आरोग्य अधिकारी हे गेले काही दिवसांपासून वादात राहिलेले आहेत त्यांच्यावर या आधी कारवाई करण्यात आलेली आहे. कोविड काळात तत्कालीन नगरसेवकांनी रेमडीसीवर इंजेक्शन प्रकरणी यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर एका अल्पवयीन मुलीला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणातही आरोग्य अधिकारी काही दिवस फरार होते. तर गाणे गाण्याच्या प्रकरणातही त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आरोग्य अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईचे सर्वसामान्य जनतेमधून स्वागत होत असून महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी डॉ. बोरगे यांच्यावर केलेल्या कारवाईचे प्रशासकीय व सामाजिक स्तरावरून समर्थन होत आहे.