अहिल्यानगर-
मुसळधार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यात येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित प्रयोगशील शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांच्या ” लव्ह द रूफ ” या संकल्पनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या “फ्लेक्स बँक” या उपक्रमाच्या माध्यमातून जुने-टाकाऊ-वापरलेले फ्लेक्स संकलित करून झोपड्या,गोठे,खुराडे,पिंजरे, रस्त्यावरील फेरीवाले तसेच बेघरांसाठी पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून सामाजिक भावनेतून आतापर्यंत सुमारे पाच हजार फ्लेक्सचे मोफत वाटप डॉ.बागुल यांनी केले आहे तसेच कुणाकडे असे टाकाऊ फ्लेक्स असल्यास त्यांनी या उपक्रमासाठी दान करावेत,असे आवाहन देखील डॉ. बागुल यांनी केले आहे.

ज्यांना उदरनिर्वाहासाठी, व्यवसायासाठी दररोज बाहेर पडावेच लागते अशा हातावर पोट असणारे रस्त्यावरील विविध विक्रेते व फिरती विक्री-सेवा देणारे फेरीवाले-दुकानदार,भाजीबाजार, बस व रेल्वेस्थानक,मंदिर-मशीद-गुरुद्वारा याबाहेरील याचक, तृतीयपंथी,शरीर विक्रय क्षेत्रातील सदस्य,रस्त्यावर कला सादर करून गुजराण करणारे कलाकार, कागद-काच-कचरावेचक, गरीब शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे, खुराडे, चारा,खते,विहीरीवरील मोटर, स्टार्टर झाकण्याकामी यांसाठी चार बाय तीन,पाच बाय पाच,पंधरा बाय वीस अशा विविध आकारातील आवश्यकतेनुसार फ्लेक्सचे तुकडे वितरित केले आहेत. शहर व नगर तालुक्यानजीकच्या चार-पाच तालुक्यांमध्ये डॉ.बागुल यांनी गरजवंतांशी संपर्क साधून गेल्या दोन महिन्यांपासून हे टाकाऊ फ्लेक्स त्यांच्यापर्यंत मोफत पण स्वखर्चातून पोहोचवले आहेत.
गेल्या २५ वर्षातील विविध हजारो कार्यक्रमांतील सूत्रसंचालन ,रांगोळी रेखाटन, नियोजन, ग्राफिक डिझायनिंग व विविध संकल्पना राबवताना विविध व्यक्ती-संस्था-संघटना यांच्याकडून डॉ.बागूल यांनी हे टाकाऊ ठरणारे फ्लेक्स संकलित केले आहेत.खराब,धुळीने माखलेले व काही फाटके फ्लेक्स स्वच्छ करून चिकटवून त्याचबरोबर “टाकाऊपासून गरजूंची सोय” या सूत्राचा वापर करून डॉ. बागुल यांनी हे फ्लेक्स मोफत वितरीत केले आहेत. काही फ्लेक्सवरील चित्रे व मजकूर यांचा अनादर होऊ नये,याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी प्रत्येक गरजवंताला केलेले आहे.
या पावसाळ्यात सुमारे दहा हजार फ्लेक्सच्या तुकड्यांचे वितरण करण्याचा डॉ. बागुल यांचा मानस असून ज्या कोणी व्यक्ती-संस्था-संघटना यांच्याकडे झालेल्या कार्यक्रमांचे जुने टाकाऊ वापरलेले फ्लेक्स असल्यास 9595 54 5555 या क्रमांकावर संपर्क साधून दान करावेत अथवा त्यांच्याकडून फ्लेक्स नेण्याची व्यवस्था करण्यात येईल अथवा आपल्या आसपासच्या परिसरातील अशा गरजू व्यक्ती-पशुपक्षी-प्राण्यांसाठी दान करावेत असे आवाहन डॉ.बागूल यांनी केले आहे.





