अहिल्यानगर दिनांक 5 डिसेंबर
कोरोना काळात बबनराव नारायण खोकराळे यांच्यावर चुकीचे वैद्यकीय उपचार केल्याचा आरोप असलेले आणि त्यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेले डॉ. गोपाळ बहुरुपी यांच्यासह इतर पाच डॉक्टरांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या गंभीर होण्याचा तपास आता अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग करण्यात आला आहे. स्व. बबनराव खोकराळे यांचे सुपुत्र असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोक खोकराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याप्रकरणी सातत्यानं पाठपुरावा केला होता.

दरम्यान, या खटल्याचं काम पाहत असलेले ॲडव्होकेट अनिकेत कुलाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. ॲडव्होकेट कुलाळ यांनी सांगितलं, की या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे आणि डॉ. बहुरुपी यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सदर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर तपासी अधिकारी बदलण्याचे आदेश देण्यात आले. यातला एक आरोपी इतर एका गुन्ह्यामध्ये फरार असूनही बी. एन. एस. ३५ / ३ ची नोटीस देऊन पोलिसांचा तपास सुरु आहे. इथून पुढच्या काळात या तपासावर नियंत्रण ठेवण्याचे आणि देखरेख करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
स्व. बबनराव खोकराळे यांच्या घशात खवखव होत असल्याने त्यांना डॉक्टर बहुरूपी यांच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांना कोरोना झाल्याचं खोटं सांगून डॉक्टर बहुरूपी आणि इतर डॉक्टरांनी त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय उपचार केल्याचा आरोप अशोक खोकराळे यांनी केला. या संदर्भात त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे खोकराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाच्या आदेशानुसार डॉ. बहुरुपी आणि इतर पाच डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून डॉक्टर बहुरूपी आणि इतर पाच डॉक्टर फरार आहेत. डॉक्टर बहुरूपी हे कागदोपत्री फरार असून ते प्रत्यक्षात नगर शहरात फिरत असल्याचं खोकराळे यांचे वकील कुलाळ यांनी कोर्टाच्या निदर्शनात आणून दिले. दरम्यान, डॉक्टर बहुरूपी आणि इतर पाच डॉक्टरांना अटक करण्यात न आल्याने कोर्टाने शंका उपस्थित केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याचं ॲडव्होकेट अनिकेत कुलाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.





