अहिल्यानगर प्रतिनिधी | दि. ११ सप्टेंबर २०२५
आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रॅक्टिसपुरते मर्यादित न राहता सामाजिक आरोग्य प्रश्नांवर काम करून देशाच्या विकासात सक्रीय भूमिका बजवावी, या व्यापक उद्देशाने ८ वे अखिल भारतीय वैद्यकीय व दंत चिकित्सा विद्यार्थी अधिवेशन दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज कॅम्पस, अहिल्यानगर येथे होत आहे. या अधिवेशनाची घोषणा शहरात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

“समग्र आरोग्य सेवा: मन-शरीर-जीवन शैली” या मुख्य विषयावर आधारित या अधिवेशनात प्रतिबंधात्मक आरोग्य, जीवनशैली औषधोपचार, पर्यायी आरोग्य पद्धती, सामुदायिक व पर्यावरणीय आरोग्य यांसारख्या विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन व संवाद घडवून आणण्यात येणार आहे. मेडिवीजन या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय मंचाद्वारे हे अधिवेशन घेण्यात येणार असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सक्रिय सहभाग असणार आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन सत्र १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून जलसंपदा विभागाचे कॅबिनेट मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ होईल. या वेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ, राष्ट्रीय सह संघटन मंत्री अभाविप डॉ. एस. बालकृष्ण उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
१४ सप्टेंबर रोजीच्या समारोप सत्राला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अभाविप राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंग सोळंकी, तसेच राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री. देवदत्त जोशी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. मौलिक ठक्कर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या अधिवेशनात देशभरातून ४०० वैद्यकीय आणि दंतचिकित्सा विद्यार्थी सहभागी होणार असून विद्यार्थ्यांना प्रामाणिक वैद्यकीय प्रॅक्टिस, आरोग्य संस्कृती, राष्ट्रवाद व सामाजिक बांधिलकी यांचे महत्व अधोरेखित करणारे मार्गदर्शन मिळणार आहे, असे अथर्व कुलकर्णी आणि अनुष्का निंबाळकर यांनी सांगितले.
आरोग्य व शिक्षण या दोन घटकांना एकत्र आणून वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे, ही या अधिवेशनाची प्रमुख प्रेरणा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.





