धुळे दि.२७ एप्रिल
धुळ्यातील सोनगीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग करताना एका गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत ९० तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत पोलिसांनी ७लाख १३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे.
सोनगीर पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळेच्या दिशेने एक भरधाव स्कॉर्पिओ कार येत होती. पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून स्कॉर्पिओ चालकाने गाडीचा वेग वाढवला. पोलीसांनीही गाडीचा पाठलाग सुरू ठेवला अखेर थरारक पाठलागा नंतर स्कॉर्पिओ गाडी थांबवून पोलिसांनी आत बसलेल्या चार जणांची विचारपूस करून गाडीची झडती घेतली असता त्याच्याकडे ९० तलवारी आढळून आल्या. सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींच्या सोबत ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.