अहिल्यानगर दिनांक ८ नोव्हेंबर
लोकसभेला महायुती विरोधात एक मोठी सुप्त लाट होती त्यामुळेच महाविकास आघाडीला अनपेक्षित असे यश मिळाले ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बोटावर मोजण्याचे खासदार होते त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनपेक्षितपणे भरारी घेतली होती. त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंजावती दौरा केला त्यामुळे महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले शरद पवारांच्या बरोबर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचेही मोठे यश या निवडणुकीत पाहायला मिळाले होते.
मात्र विधानसभेत हे गणित कुठेतरी चुकले आहे. त्यामुळे लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत राहिलेली नाही. राज्यात सह अहिल्यानगर जिल्ह्यात जो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्याच बालेकिल्ल्यात अनेक ठिकाणी उमेदवार देताना विचार केला गेला नाही त्यामुळे निवडणुकीतील रंगत निघून गेली आहे. लोकसभेच्या लाटेवर विधानसभेत आपण निवडून येऊ या भरोशावर जे भावी आमदार अवलंबून आहेत त्यांना मात्र आता मोठी मेहनत घेऊन या निवडणुकीत यश मिळवावे लागणार आहे.
अहिल्यानगर दक्षिण भागाचा विचार केला असता या भागात लोकसभेला निलेश लंके यांनी बलाढ्य उमेदवार असलेल्या सुजय विखे पाटील यांचा पराभव करून एक इतिहास केला मात्र तशी परिस्थिती आता विधानसभा निवडणुकीत राहिलेली नाही. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड आणि शेवगाव पाथर्डी या मतदारसंघात महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
शेवगाव पाथर्डी मध्ये महाविकास आघाडी कडून प्रताप ढाकणे तर महायुतीकडून विद्यमान आमदार मोनिका राजळे आमने-सामने समोर आहेत. अपक्ष असलेल्या काकडे आणि चंद्रशेखर घुले यांच्यामुळे दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढलेली आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात जरांगे फॅक्टरचाही मोठा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला महाविकास आघाडी कुठेतरी प्लस मध्ये दिसत असताना दोन अपक्ष उमेदवारांनी आघाडीचे गणित बिघडून ठेवले आहे तर विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना यावर्षी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
त्याचबरोबर कर्जत जामखेड मतदारसंघात विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांची पारंपरिक टक्कर होणार आहे. आमदार राम शिंदे यांनी मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मतदार संघात तळ ठोकला आहे. विधान परिषदेचे आमदार झाल्यापासून त्यांनी विविध विकास कामांसाठी मोठा निधी कर्जत जामखेड परिसरात आणला आहे. एमआयडीसीच्या प्रश्नावरून दोन्हीही आमदार सध्या आमने-सामने येत या प्रश्नावर या निवडणुकीत चांगलीच जुगलबंदी सुरू आहे. यावर्षी आमदार राम शिंदे यांनी आपल्या हक्काचा आणि आपल्या मातीतील माणूस म्हणून मतदारांसमोर जात आहेत बाहेरचे पार्सल बाहेर काढून द्यायचे असा निश्चय करत त्यांनी रोहित पवार यांच्याविरुद्ध रान उठवले आहे. मात्र मतदार आपल्या पाठीशी असून पाच वर्षात झालेल्या विकास कामांमुळे या वर्षी सुद्धा आपणच निवडून येऊ अशी खात्री विद्यमान आमदार रोहित पवार यांना आहे. बाहेरचा आणि परका याबाबत बोलताना ते थेट नरेंद्र मोदी तसेच भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे उदाहरण देऊन भाजप नेत्यांना उलट प्रश्न विचारून अडचणीत आणत आहेत त्यामुळे या ठिकाणी तुल्यबळ लढत होणार आहे.
श्रीगोंदा मतदार संघात सुरुवातीपासूनच अनिश्चिततेचे वातावरण होते महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोण उमेदवार राहील हे निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एक प्रश्नचिन्ह होते. महायुतीकडून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांचा अर्ज कायम राहून ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा प्रवास करत अनुराधा नागवडे या महाविकास आघाडी कडून उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी करत असलेले माजी आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी डावलण्यात आली त्यामुळे त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली त्यामुळे आता राहुल जगताप यांची अपक्ष उमेदवारी कोणाची गणिते बिघडवणार हेच पाहणे उचित ठरणार आहे. कारण राहुल जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या मतदारसंघात चांगलीच उलथापालथ झाली आहे. तिरंगी लढतीत शेवटच्या क्षणी कोण बाजी मारल हे 23 तारखेला कळणार आहे मात्र राहुल जगताप यांच्या एन्ट्रीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची चिंता वाढली हे निश्चित.
पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वी खासदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यांचा विजय झाला मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांना त्यांनी विधानसभेचा शब्द दिल्याच्या चर्चा आहेत मात्र आता विधानसभेला थेट त्यांच्याच घरात उमेदवारी गेल्यामुळे महाविकास आघाडी मधील अनेक जणांनी बंडाचे निशाण पुकारले होते काही ठिकाणी बंड शामवले जरी असले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संदेश कार्ले यांच्या रूपाने मोठे संकट लंके यांच्यासमोर उभे राहिलेले आहे संदेश कार्ले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. महाविकास आघाडी बरोबर महायुतीमध्ये सुद्धा बंडखोरी झाली असून महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्यासमोर माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या रूपाने बंडखोर समोर असून त्याचबरोबर माजी आमदार विजय औटी यांनीही अपक्ष म्हणून या निवडणुकीत उडी घेतल्यामुळे या ठिकाणी पंचरंगी निवडणूक होणार आहे मात्र या पंचरंगी निवडणुकीत शेवटपर्यंत कोण बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कारण पारनेर मतदारसंघ हा लोकसभेचे खासदार निलेश लंके यांचा मतदारसंघ आणि त्यांची पत्नी या मतदारसंघात उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नगर शहर मतदारसंघातही अनेक घडामोडी झाल्या नगर शहर मतदार संघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये नगर शहराची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे गेल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते त्यांनी महाविकास आघाडी विरुद्ध भूमिका घेण्याचे ठरवून थेट खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले त्यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी अर्ज दाखल करून बंडाचे निशाणही फडकवले होते. शेवटच्या क्षणी अर्ज कायम ठेवून निवडणुकीच्या रिंगणात शशिकांत गाडे उतरले होते मात्र 24 तासांमध्ये काय जादू झाली माहित नाही आणि शशिकांत गाडे यांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना जाहीर केला. जरी हा पाठिंबा जाहीर झाला असला तरी अनेक निष्ठावान शिवसैनिक या निर्णयाबाबत खाजगी मध्ये बोलताना नाराजी व्यक्त करत आहेत. पंचवीस वर्ष नगर शहरात स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांनी राज्य केले नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना थेट तो दुसऱ्या पक्षाला आंदण म्हणून दिला गेला त्यामुळे शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते अशी भावना निष्ठावंत शिवसैनिकांची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांना स्व पक्षासह महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांचे तगडे आव्हान आहे.
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेला महाविकास आघाडीचे वारे होते.बलाढ्य अशा सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके यांच्यासारख्या सर्वसामान्य घरातील माणसाला दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी खासदार म्हणून दिल्लीला पाठवले याचाच फायदा विधानसभेलाही झाला असता मात्र जागा वाटपाचे वरिष्ठांचे निर्णय चुकले आणि लोकसभेला असलेले वातावरण कुठेतरी आता फिरल्यासारखे दिसून येत आहे. प्रामुख्याने श्रीगोंदा मतदारसंघ आणि नगर शहर मतदार संघातील निर्णय हा मतदारांना नव्हे तर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना पटलेला नाही त्यामुळे पारनेर, नगर आणि श्रीगोंदा मतदार संघात शिवसैनिक नाराज झाले आहेत.जिल्ह्यात मोजून दोन जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या असून दोन्ही ठिकाणी बाहेरून आलेले उमेदवार दिल्या गेल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज झालेले आहेत. याचा फटका या निवडणुकीत बसू शकतो त्यामुळे लोकसभेला असलेले बेरजेचे गणित आता विधानसभेला वजाबाकी मध्ये जाण्याची शक्यता आहे.