Home शहर पंधरा वर्षांची प्रतीक्षा संपणार प्रोफेसर कॉलनी चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा...

पंधरा वर्षांची प्रतीक्षा संपणार प्रोफेसर कॉलनी चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे सर्व अडथळे दूर -महापौर रोहिणी शेंडगे

अहमदनगर दि.१३ नोव्हेंबर

सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी व मनपा मुख्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मार्केट यार्ड चौकामध्ये बसवण्यात येणार असून महात्मा ज्योतिबा फुले यांचाही पुतळा बसवण्यात येणार आहे. आज अहमदनगर महानगरपालिकेमध्ये महापौर रोहिणी शेंडगे यांनी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या समवेत बैठक घेऊन शहरातील पुतळ्यांचा विषय मार्गी लावण्याबाबत विविध सूचना दिले आहेत. या बैठकीला शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम माजी नगरसेवक संजय शेंडगे नगरसेवक श्याम नळकांडे उपस्थित होते.

प्रोफेसर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराज आणि महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांबाबत पोलीस प्रशासनाने ना हरकत दिल्यानंतर आता महानगरपालिकेकडून या पुतळे आणि सुशोभीकरण करण्यासाठी देयके तातडीने अदा करण्याच्या सूचना महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा पुणे येथील परदेशी नामक कलाकाराने साकारला असून महानगरपालिकेने आतापर्यंत परदेशी यांना 80 टक्के रक्कम अदा केली आहे त्यामुळे आता उर्वरित रक्कम अदा करून हा पुतळा महापालिका प्रशासन ताब्यात घेऊ शकते त्या दृष्टीने महापौर रोहिणी शेंडगे यांनी सूचना दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांबाबत निविदा मागवूनन हे कामही तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संभाजी महाराज पुतळ्याचा इतिहास
नगर शहरात छत्रपती संभाजीराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव २००७ मध्ये महापालिकेने केला होता. त्यानुसार सुमारे १० लाख रुपये खर्चून १० ते १२ फूट उंचीचा ब्राँझ पुतळा तयार करण्यात आला आहे. पुण्यातील शिल्पकार परदेशी यांनी तो तयार केला आहे. या पुतळ्यासाठी ८० टक्क्यांवर रक्कम त्यांना अदा केली गेली आहे. त्या वेळी नगर-कल्याण रस्त्यावरील नेप्ती चौकात हा पुतळा उभारण्याचे नियोजन होते. मात्र, नंतर नगर-कल्याण महामार्गाचे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याने व त्याची रुंदी वाढल्याने या चौकात पुतळ्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे मग हा पुतळा सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकात उभारणीचे प्रस्तावित करण्यात आले. पण सरकारच्या सार्वजनिक पुतळा उभारणीबाबतच्या धोरणानुसार पोलिसांचा ना-हरकत दाखला महत्त्वाचा केला गेला असल्याने २००८ मध्ये महापालिकेने तसा प्रस्ताव पोलिसांना दिला. पोलिसांनी प्रोफेसर कॉलनी चौकातील जागेची पाहणीही केली. पण या चौकातील वाहतूक तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या कारणाने पुतळा येथे उभारण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे तेव्हापासून हा विषय बंद झाला होता. त्यानंतर पोलिसांनीच सुचवल्यानुसार महापालिका प्रशासनाने सावेडीतील टीव्ही सेंटरमागील गंगा उद्यानात हा पुतळा बसवण्याचे ठरवले होते. पण नगरसेवकांचा त्याला विरोध झाला. त्यामुळे पुतळ्याचे भिजत घोंगडे कायम राहिले.

मध्यंतरी हिंदुराष्ट्र सेना आणि मनसेच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांनी रात्रीतुन प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडल्यानंतर या पुतळ्याचा प्रश्न पुन्हा गरमागरमित आला होता. अखेर शेवटी या पुतळा उभा करण्यात बाबतचे सर्व सोपस्कर पूर्ण झाले असून हा पुतळा कधी या ठिकाणी बसतो याकडे आता संभाजी महाराज प्रेमींचे आणि नगरवासीयांचे यांचे लक्ष लागून आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version