अहमदनगर -दि.25 ऑक्टोबर
लोकाश्रयावर आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या व्यापक सहभागातून विविध 27 सेवा प्रकल्प चालविणारे स्नेहालय, हे देशातील एक अनोखे सेवातीर्थ आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कामाला स्नेहालय संस्थेच्या भेटीने आजपासून सुरुवात होत असल्याचा आनंद वाटतो,असे प्रतिपादन नगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज केले. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्नेहालय संस्थेत आज दिवाळीचे सदिच्छा भोजन दिले. त्यांनी स्नेहालयाच्या विविध प्रकल्पांना भेटी देऊन मुलांसोबत जेवण केले.फटाके आणि मिठाई मुलांना दिली.
यावेळी पोलीस उपअधीक्षक अनिल कटके, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे , केंद्रीय दूरसंचार विभागाचे संचालक सौरभ देशमुख,उद्योजक ऋत्विक वाबळे, स्नेहालयचे संचालक हनीफ शेख, चंद्रकांत शेंबडे ,संजय गुगळे ,राजीव गुजर, आदी यावेळी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक ओला यांनी स्नेहलयचा माहितीपट पहिला. येथील इंग्रजी माध्यम शाळा, केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल , रोजगार प्रशिक्षण केंद्र ,समृद्ध ग्रंथालय, वसतिगृहाच्या नवीन वास्तू , भोजनगृह , कला स्टुडिओ , आदी प्रकल्पांना पोलीस अधीक्षक ओला यांनी भेटी दिल्या. लाभार्थी मुला मुलींशी स्वतंत्र संवाद केला.
वंचितांच्या हक्क रक्षणासाठी पोलिसांची भूमिका अग्रकर्मी ( proactive )राहील ,असे यावेळी त्यांनी सांगितले. पोलिस प्रशासनात येण्यापूर्वी राजस्थान मध्ये न्यायाधीश म्हणून सात वर्षे केलेल्या कामाचा पोलीस प्रशासनात प्रश्न समजून घेताना उपयोग होतो ,असेही त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक ओला यांच्या हस्ते आंब्याचे झाड लावण्यात आले.