अहिल्यानगर (प्रतिनिधी)— सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे, तर भारतीय राज्यघटनेवरचा हल्ला असून, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर जिजाऊ ब्रिगेडतर्फे आयोजित विशेष बैठकीत हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. दक्षिण जिल्हा अध्यक्षा नंदिनी बाळासाहेब सोनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तीन ठराव मांडण्यात आले यामध्ये हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध, सनातनी प्रवृत्तीचा निषेध आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी या सर्व ठरावांना उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.

नंदिनी सोनाळे म्हणाल्या, “सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा न्यायव्यवस्थेवरील नाही, तर थेट संविधानावरचा हल्ला आहे. जर आपण आज या घटनेचा निषेध केला नाही, तर अशा प्रवृत्ती वाढीस लागतील. याचा निषेध नोंदवण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.”या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष योगिता कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष संपूर्णाताई सावंत, उपाध्यक्षा प्रतीक्षा भुकन, अनुराधा येवले, रुपाली करांडे, प्रतिभा सोनाळे, कांता बोटे, मीनाक्षी वागस्कर, निर्मला काळदाते, रेखा घोरपडे, प्रमिला पाटील आदींनी आपल्या भावना व्यक्त करत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.





