अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरात सध्या शिस्त लागावी म्हणून महानगरपालिकेने खाजगी ठेकेदारामार्फत शहरातील बेशिस्तीत लावणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी वाहनावर दंडात्मक कारवाई सुरू केली होती.वाहनधारक आपले वाहन बेशिस्तपने लावत असेल तर किंवा नो पार्किंग मध्ये लावत असतील तर त्या ठिकाणी दंड आकारण्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र हा दंड मोठ्या प्रमाणात असल्याने मोठी ओरड झाल्याने अखेर मनपा आयुक्तांनी या दंडात कपात केली आहे. यावर सर्वसामान्य नगरकर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा यांनी आयुक्तांना एक खुले पत्र लिहिले असून नगरकरांना हा दंड कमी झालेला हवा का ? एवढे तरी विचारा असा सवाल त्यांनी या पात्रातून केला आहे.

असे आहे ते पत्र….
आयुक्त साहेब नो पार्किंग आणि दंड चा विषय वादग्रस्त होत चालला आहे रोज गाडी उचलण्यावरून लोकांची भांडणं , हेळसांड , दहशत , भिती हे काय देताय नगरकरांना तुम्ही? कुणी दवाखान्यात असतं तर कुणी हॉटेल मध्ये असतं तर कुणी बॅंकेत असतं तर कुणाचं काही वेगळं कामाचं ठिकाण असतं या सगळ्यात अचानक हमला झाल्या सारखी पळापळ होते ती सर्वसामान्य माणसाची जो ५० रूपयांची भाजी घ्यायला बाजारात आलेला असतो आणि त्याला ५००/७०० रूपयांचा दंड लागतो .. हे शहर ८०% अगदी सर्वसामान्यांचं शहर आहे हातावर पोट असणाऱ्यांचं त्यांना ५००/७०० म्हणजे पगाराचा एक भाग असतो , विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक फी चा एक भाग असतो तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणारे ५०% असतात ते ५००/७०० रूपये…तुमच्या साठी एक दोन नोटा असतील पण सर्वसामान्यांना उगाच वेठीस धरू नका. तुमचे जाण्याचे दिवस ( बदली , बढती , हकालपट्टी वगैरे वगैरे ) आले म्हणून नगरकरांच्या माथी उगाचच काही तरी औदसा लादून जाऊ नका. लोकं तुम्हाला आणि तुमच्या कामाला लक्षात ठेवतील असं काही तरी काम करा , शहरातील ओढ्याचे रूपांतर छोट्याश्या नाल्यात होतंय , दिवसा ढवळ्या ताबेमारी सुरू आहे , सीना नदी स्वच्छता – अतिक्रमण – रूंदीकरण – खोलीकरणाचा प्रश्न प्रलंबित , रस्त्यांची चाळण , बाजारपेठेतील अतिक्रमण , शहरातील स्वच्छतागृहांची ( सुलभ शौचालय ) भंगार अवस्था , हप्तेखोर मंडळी , योग्य पादचारी मार्ग , बंद सिग्नल व्यवस्था , झेब्रा क्रॉसिंग चे नियोजन आणि बरंच काही आहे शहरात काम करण्यासाठी पण तुमचं सगळं लक्ष फक्त कॅश जमा करण्यात.. हे बरं नव्हे हे खुलं पत्र माझं वैयक्तिक किंवा राजकीय समजू नका हे सर्वसामान्य नगरकराचं पत्र आहे अस्सल नगरी भाषेत.. लोकांना जे हवं ते द्या पण नको ते कुटाने डोक्यात टाकू नका ही विनंती.
सुमित एस वर्मा
एक नगरकर





