अहिल्यानगर –
अनधिकृतपणे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाई केली आहे. अहिल्यानगर – मनमाड महामार्गावर पत्रकार चौक ते बोल्हेगाव फाटा दरम्यान नव्याने बसवण्यात आलेल्या पथदिव्यांच्या खांबांवर लावण्यात आलेले बेकायदा जाहिरात फलक आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतः उभे राहून हटवून घेतले. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

महापालिकेने अलीकडेच पत्रकार चौक ते बोल्हेगाव फाटा या दरम्यान नवीन पथदिव्यांचे खांब बसवून पथदिवे सुरू केले आहेत. मात्र, अवघ्या काही दिवसांतच या खांबांवर खासगी कंपन्या आणि व्यावसायिकांनी जाहिरातीचे फलक लावून खांबांचे विद्रुपीकरण केले. या मार्गावरून जात असताना आयुक्त यशवंत डांगे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाला पाचारण केले. आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी थांबून अतिक्रमण विभागाकडून सर्व खांबांवरील जाहिरात फलक काढण्याची कारवाई करून घेतली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि शहराचे विद्रुपीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
बेकायदा फलक eविद्रुपीकरण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. यापूर्वीच उड्डाणपुलाच्या खांबावर पोस्टर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणातही कठोर कारवाई केली जाईल. संबंधित जाहिरातदार संस्थेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच उड्डाणपुलाच्या खांबावर अनधिकृतपणे पोस्टर चिटकवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे.





