अहमदनगर दि.१० डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांच्या दुरावस्थेमुळे अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. अखेर या प्रश्नासाठी गेल्या चार दिवसांपासून पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आमरण उपोषणासाठी बसले आहेत.त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.

शुक्रवारी रात्री माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांची भेट घेऊन अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या दहशतवादा विरुद्ध एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला आणि आपण आत्मक्लेष करण्यापेक्षा त्यांना क्लेश करायला लावू त्यामुळे आपण उपोषण सोडा अशी विनंती केली. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अधिकारी कश्या प्रकारे दबावाखाली काम करतात अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. जिल्हाधिकाऱ्यांना आम्हीच या ठिकाणी घेऊन आलो मात्र आता तेच आमचे ऐकत नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. मात्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे तिथून निघून जाताच काही मिनिटातच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह येऊन निलेश लंके यांची भेट घेऊन उपोषण सोडा अशी विनंती केली.

मात्र निलेश लंके हे आपल्या मतावर ठाम असून जोपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं आणि जर उपोषण सोडायचे असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि नॅशनल हायवे अथोरिटीने आमदार निलेश लंके यांच्या मागणीचा ड्राफ्ट तयार करून द्यावा काम किती दिवसात सुरू होईल कशा प्रकारे काम करणार या मागणीचा ड्राफ्ट तयार करण्यावर चर्चा झाली मात्र हा ड्राफ्ट अद्याप तयार झाला नसल्याने आज चौथ्या दिवशीही निलेश लंके यांचे उपोषण सुरूच राहणार आहे.

गेल्या चार दिवसांपासून ज्या मंडपात उपोषणाला बसले आहेत त्या आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला कर्डिले डेकोरेटर यांचा मंडप लागला असून नगर शहरातील पाईपलाईन रोड वरील संदीप कर्डिले यांचा मंडप व्यवसाय आहे. त्यांनी हा मंडप आणि सर्व साहित्य पुरवले आहे मात्र मंडपाच्यावर कर्डिले डेकोरेटर अशी पाटी लावल्याने मिश्किलपणे या ठिकाणी बोलले जातेय की आमदार लंके यांच्या उपोषणाला कर्डिले यांचा तंबू…





