अहमदनगर दि.१७ ऑगस्ट:
मुकुंद नगर प्रभागातील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक फैयाज शेख यांची शहर काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शहर काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीबद्दल शेख यांचा सत्कार करण्यात आला आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शेख यांची मेळाव्यात नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
निवडीनंतर आ.थोरात यांनी शेख यांचा सत्कार केला आहे. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापपाटील शेळके, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, प्रदेश सरचिटणीस उत्कर्षाताई रुपवते, राजेंद्रदादा नागवडे, जिल्हा बँकेचे संचालक सचिन गुजर, साई संस्थांचे विश्वस्त करण ससाने, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इंटक जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, हनीफ मोहम्मद जहागीरदार, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान आदी उपस्थित होते.
फैयाज शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करीत आहेत. त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येत नगरसेवक म्हणून मुकूंदनगर भागाचे महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. मागील निवडणुकीत त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. तरी देखील प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांचा काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने पुढाकार कायम राहिलेला आहे.
काळे म्हणाले की, मुकुंद नगर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारावर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मुकुंद नगरमध्ये पक्षाचे संघटन मजबूत असून अधिक बळकट करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात मुकुंदनगर मधून अनेक चेहरे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून फैयाज शेख यांना पक्षाने दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून ते देखील मुकुंदनगरमध्ये पक्ष वाढीसाठी चांगले काम करतील, असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.