Homeशहरनगरकर हो, ऐकलंत का, नगर ग्राम पंचाईत खाजगी तत्त्वावर चालवायला देणे आहे...

नगरकर हो, ऐकलंत का, नगर ग्राम पंचाईत खाजगी तत्त्वावर चालवायला देणे आहे ;शहर काँग्रेसने सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केली उपहासात्मक निविदा

advertisement

अहमदनगर दि.६ सप्टेंबर :

अहमदनगर मनपाने शहर पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणाचा (privatization) प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. शहर काँग्रेसने या प्रस्तावाला तीव्र विरोध केला असून जिल्हाध्यक्ष किरण काळे (District President Kiran Kale) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा अतिरिक्त आयुक्तांची(additional commissioners) सोमवारी भेट घेत काँग्रेसचा विरोध असल्याचे लेखी निवेदन प्रशासनाला दिले होते. त्यानंतर मनपाने प्रसिद्धी पत्रक जारी करत प्रसारमाध्यमांनी चुकीच्या बातम्या छापून गैरसमज पसरविला असल्याचे माध्यमांवरच (Media) खापर फोडले आहे. मनपाला आपला खाजगीकरणाचा डाव अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यामुळे मनपा सावरासावर करत असून याचे खापर माध्यमांवर फोडत असल्याचे म्हणत काँग्रेसने मनपाचा निषेध केला आहे.

दरम्यान, शहर जिल्हा काँग्रेसने नागरिक हो, ऐकलत का, नगर ग्राम पंचाईत खाजगीतत्वावर चालवायला देणे आहे, असे म्हणत सोशल मीडियाद्वारे( sochelmedia) उपहासात्मक निविदा प्रसिद्ध केली आहे. काँग्रेसच्या या निविदेने नगरकरांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. निविदा प्रकाशक, त्यातील मजकूर याचे जर अन्य कोणत्याही यंत्रणेच्या नावाशी अथवा कामाच्या स्वरूपाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा असे निविदेच्या शेवटी काँग्रेसने म्हटले आहे.

जाहीर निविदा – नगर ग्रामपंचाईत :नगर ग्रामपंचाईतीच्या वतीने नगर ग्रामपंचाईत खाजगी तत्त्वावर चालविण्यासाठी द्यावयाची आहे. यासाठी सक्षम खाजगी ठेकेदार / कंत्राटदार / व्यावसायिक संस्था / खाजगी कंपन्या हे अर्ज करू शकतात. कामाचे स्वरूप : १) आमचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांमार्फत चालविणे. २) आम्ही नागरिकांना पुरविणे अपेक्षित असणाऱ्या सर्व सुविधा जसे की ; पाणी, रस्ते, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापण आदी सुविधा खाजगी तत्वावर ठेकेदारी पद्धतीने पुरविणे. ३) मालमत्ता कर, पाणी कर यासह सर्व प्रकारचे कर फायनान्स कंपन्यांच्या वसुली टोळ्यांप्रमाणे पथके स्थापन करून वसुली करणे. ४) कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असणारे अशिक्षित, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे, ताबा मारणे, दमदाटी करणे आदी प्रकारची कौशल्य असणारे मनुष्यबळ पुरविणे. ५) तांत्रिक बाबींमध्ये तज्ञ व्यक्ती, संस्थांचे तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे कामी अनुभवी खाजगी टोळ्यांचे सहाय्य उपलब्ध करून देणे. ६) कामकाजाचे संगणकीकरण न करता जनतेच्या पैशाचा केलेला भ्रष्टाचार, केलेल्या चोऱ्या कोणत्याही चौकशांमध्ये सापडणार नाहीत अशा अद्यावत पद्धतीने कामकाज चालविणे आदी.

अर्ज करण्यासाठीच्या अटी व शर्ती : यासाठी निविदा दाखल करू इच्छिणाऱ्या सक्षम खाजगी ठेकेदार / कंत्राटदार यांची पुढील अटी व शर्तींना अधीन राहून खाली नमूद सेवा पुरवठा करण्याची पात्रता असणे आवश्यक आहे. १) तुम्हाला नागरिकांना सेवा पुरवठा करण्यासाठीच्या मोबदल्यात आमच्याकडून रक्कम अदा केली जाईल. सेवा माञ नागरिकांना नव्हे तर आमचे पदाधिकारी, जनप्रतिनिधी यांना खाजगीस्तरावर व वैयक्तिक पातळीवर द्यावी लागेल. उदाहरणार्थ : पदाधिकारी, जनप्रतिनिधी यांच्या घरी साफसफाईचे काम करणे, त्यांच्या खाजगी वाहनांवर चालक पुरविणे, त्यांच्या खाजगी कामासाठीच्या कार्यालयांमध्ये काम करणे, त्यांच्या घरच्यांची सेवा करणे आदी. २) सेवा पुरवठादार म्हणून पात्र होण्यासाठी तुमच्याकडे ताबा मारणे, वसुली करणे, बेकायदेशीर कामे करणे, खोटी बिले सादर करणे, भ्रष्टाचार करणे, फसवणूक करणे, दमदाटी करणे आदी तत्सम प्रकारच्या विविध कामांचा दांडगा अनुभव असणे अनिवार्य आहे.

३) एकाच कामाची एकापेक्षा अधिक वेळा खोटी बिले तयार करणे, एकच काम एकाच वेळी अनेक निधीमधून करून एकाच कामाची एकाच वेळी अनेक बिले लाटण्याचा अनुभव असणे, न केलेल्या कामांची लाखो – कोट्यावधी रुपयांची बिले तयार करणे व लाटणे, निकृष्ट दर्जाची कामे करण्याचे तंत्र अवगत असणे व अशा प्रकारच्या निकृष्ट कामे करण्याचा प्रदीर्घ अनुभव असणे आवश्यक आहे. ४) आमच्या कार्यक्षेत्रातील रस्ते वारंवार खोदाई करण्यासाठीच्या टोळ्या २४ तास ३६५ दिवस उपलब्ध करून देणे आवश्यक असून जास्तीत जास्त टक्केवारी खाण्याचा प्रदीर्घ अनुभव असणे आवश्यक आहे.

६) नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठेकेदाराचे अद्यावत कॉल सेंटर असणे आवश्यक आहे. याचा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करून नागरिकांना २४ तास सेवा द्यावी लागेल. यावर येणाऱ्या फोन कॉल्सला प्रत्यक्षात कोणतीही समस्या न सोडवता केवळ शाब्दिक सांत्वन करून तसेच दिशाभूल करून नागरिकांची फसवणूक करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ सेंटरमध्ये असावे. ७) कार्यालयामध्ये नागरी समस्या, तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांचे अर्ज दाखल करून घेत त्यांना वारंवार खेटा मारायला लावले, त्यांचे प्रश्न न सोडवणे, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना, मंच, जागरूक नागरिक आदींचे आंदोलनं, मोर्चे कार्यालयावर आल्यास त्यांना आपले प्रश्न सोडवले जातील असा शत प्रतिशत खोटा विश्वास आणि दिलासा देण्याचे कौशल्य असणारे खोटं बोलत नागरिकांना वेड्यात काढण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे मनुष्यबळ आपल्याला पुरवावे लागेल.

८) जनतेच्या पैशातून बांधलेल्या जुन्या वास्तू जसे की ; भाजी मार्केट, व्यावसायिक मार्केट आदी पाडण्याचा अनुभव असणे आवश्यक असून त्या पाडून परत कोणत्याही परिस्थितीत उभ्या न होऊ देण्याची ठेकेदार संस्थेची तयारी असणे आवश्यक आहे. ९) मालमत्ता कर, पाणी कर यासह विविध प्रकारच्या करांच्या वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांच्या वसुली पथकांप्रमाणे अत्यंत कठोर पद्धतीने वसुली करू शकणारी गुंड प्रवृत्तीची, अनुभवी मनुष्यबळ आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तसेच सदर वसुली करताना जर नागरिकांनी आपल्याला आम्हाला चांगले रस्ते नाहीत, जागोजागी खड्डे आहेत, नळाला दररोज पाणी पुरेसं व स्वच्छ पाणी येत नाही, गटारं तुंबतात, पावसाचे पाणी घरात शिरते, आम्हाला कोणती सुविधा मिळत नाही अशा तक्रारी करदात्या नागरिकांनी केल्यास त्यांना या सुविधा जरी आम्ही पुरवून शकत नसलो तरी ठेकेदार संस्था आणि त्यावर पोसली जाणारी निष्क्रिय लाभार्थी पुढारी मंडळी जगणे आवश्यक असल्या कारणाने कर हा भरावाच लागेल हे पटवून देत वेळप्रसंगी कर वसुलीसाठी दमदाटी करण्याची तयारी ठेकेदार संस्थेच्या कर वसूली पथकांची असणे अनिवार्य आहे.

महत्त्वाचे :१) वर नमूद कौशल्य, प्रदीर्घ अनुभव नसणाऱ्या ठेकेदार संस्थानी कृपया निविदा दाखल करू नये. २) निविदा मंजूर होण्यासाठी मोठ्या रकमेची टक्केवारी आमची ग्रामपंचाईत चालविणाऱ्या राजकीय पुढारी यांना द्यावी लागेल. निविदा मंजूर करण्यासाठी त्यांची शिफारस आणि त्यांच्या समवेत भागीदारी करण्याची तुमची तयारी असणे या दोन्ही बाबी अनिवार्य आहेत. *विशेष प्राधान्य :* ग्रामपंचाईत समवेत यापूर्वी विविध सेवा जसे की कचरा संकलन, बस सेवा, पथदिवे बसविणे, त्याचबरोबर रस्त्यांची निकृष्ट कामे करणे आदी सेवा पुरविलेल्या जुन्या ठेकेदारांना, तसेच खोट्या आयटी कंपन्या तयार करून खोटा रोजगार देण्याचा आभास निर्माण करू शकणाऱ्या मात्र आमच्या कार्यक्षेत्रात या कामाचा पूर्वानुभव असणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य दिले जाईल.

अनिवार्य बाब : ठेका ( tenders) दिल्या जाणाऱ्या ठेकेदार संस्थेला आमच्या राजकीय पुढार्‍यांच्या बगलबच्चांना सबकॉन्ट्रॅक्ट साठीचे करारनामे करून द्यावे लागतील. तसेच सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी मते विकत घेण्यासाठी लागणारे कोट्यावधी रुपयांचे फंडिंग ठेका घेऊ इच्छिणाऱ्या ठेकेदार संस्थेला राजकीय पुढार्‍यांना द्यावे लागेल. शेवटी निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख व वेळ दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असल्याचे नमूद केले असून निविदा पाठविण्यासाठीचा gp420@gmail.com हा ई-मेल आयडी देण्यात आला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular