अ.नगर दिनांक 15 ऑक्टोबर
महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी आचारसंहिता लागू झाली असून उमेदवारांसाठी अर्ज भरण्यापासून ते मतदान आणि मतमोजणीची तारीख आता जाहीर झाली आहे निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा सर्व कार्यक्रम जाहीर केला त्यामुळे आता सर्वांना प्रतीक्षा लागली आहे की उमेदवार कोण असेल त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे मात्र ज्या ज्या ठिकाणी उमेदवारांची रस्सीखेच आहे त्या ठिकाणी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत उमेदवार कोण हे सांगता येणार नाही ज्याच्या हातात पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म तोच खरा उमेदवार हा खेळही यावर्षी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
नगर शहर मतदार संघात सध्या या निवडणुकीत उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत असून महायुती कडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र भाजपही तिकिटासाठी आग्रही असून वेळ पडली तर मैत्रीपूर्ण लढतीची तयारीही भाजपमधील काही पदाधिकारी करत आहेत. मात्र शेवटी महायुतीचा जो निर्णय होईल त्यावरच पुढचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी आमदार संग्राम जगताप यांचेच पारडे उमेदवारीसाठी जड मानले जाते.
त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी साठी यावर्षी प्रथमच मोठी रस्सीखेच असून स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेत उमेदवारासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड अथवा स्वर्गीय अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड यांच्याही नावाची चर्चा सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे माजी महापौर भगवान फुलसौंदर ,बाळासाहेब बोराटे, हेही निवडणुकीची तयारी करत आहेत. महाविकास आघाडी मधील दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉक्टर अनिल आठरे आणि माजी महापौर अभिषेक कळमकर हे सुद्धा उमेदवारी निश्चित मानून निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत तर तिसरा घटक पक्ष काँग्रेसकडून मंगल भुजबळ आणि किरण काळे यांनाही तिकीट मिळण्याची खात्री असल्यामुळे तेही नगर शहर मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा ठोकून आहेत. शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक दिलीप सातपुते हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांनी मध्यंतरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे तेही उमेदवारीवर दावा ठोकून आहेत.
मात्र या पलीकडे जाऊन आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने मोठ्या राजकीय घडामोडी होण्यास सुरुवात होणारा असून नगर शहरात सध्याच्या इच्छुकांच्या व्यतिरिक्त नवीनच चेहरा नगर शहर मतदारसंघात दिसू शकतो असा कयासही बांधला जातोय. यासाठी कोजागिरीचा मुहूर्त साधला जाणार असून जर कोजागिरीला खरंच एखाद्याला देवीचा प्रसाद ही मिळू शकतो त्यामुळे इच्छुकांच्या तयारीवर पाणीही पडू शकते. त्यामुळे उद्याची कोजागिरी पौर्णिमा ही सर्वांसाठीच महत्वाची आहे असेही म्हणता येईल एखाद्याच स्वप्न या पौर्णिमेला पूर्ण होऊ शकतं आणि एखाद्याचे स्वप्न भंगही होऊ शकते अशीच परिस्थिती सध्या नगरच्या राजकारणात असून सर्वांचे लक्ष उद्या सकाळी 11 वाजता काय होणार याकडे लागले आहे.