अहमदनगर दिनांक 30 जुलै
नगर अर्बन बँकेचे सफेद कर्जदार बँकेमध्ये थकीत कर्ज भरण्यासाठी रांगा लावून नगरा अर्बन बँकेचे आऊसाहेब गणेश गायकवाड यांना भेटण्यासाठी येत असल्याचे चित्र सध्या नगर अर्बन बँकेमध्ये दिसू लागले आहे. नगर अर्बन बँकेने सक्तीने कर्ज वसुलीचे जे पाऊल उचलले त्यानंतर हा परिणाम जाणवू लागला आहे. आणि कर्जदारांच्या घरांपुढे ढोल ताशांच्या गजरात नगर अर्बन बँकेचे कर्मचारी थकीत कर्ज वसुलीसाठी जाऊ लागल्याने आता आपल्या घरासमोर ढोल ताशा नको म्हणून अनेक लपून बसलेले कर्जदार बँकेत येऊन कर्ज भरण्याची तयारी दाखवू लागले आहेत. ही गोष्ट बँकेच्या दृष्टीने चांगली असून बँक पुन्हा एकदा चालू होऊ शकते अशी आशा आता सभासदांकडून व्यक्त होताना दिसत आहे.
त्याचबरोबर न्यायालयानेही कठोर भूमिका घेत अनेक कर्जदारांना जेलमध्ये पाठवले आहेत अनेकांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत त्यामुळे पैसे भरण्या शिवाय पर्याय नाही असा एक संदेश थकीत कर्जदारांमध्ये गेला आहे. मोठ-मोठे थकीत कर्जदार पळून गेले असले तरी त्यांच्या मालमत्ता आता जप्तीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून बँक बचाव समिती आणि ठेवीदारांच्या लढ्यामुळे बँकेला पुन्हा एकदा चांगले दिवस दिसू लागले असून अनेक पळून गेलेले संचालक आता कर्ज भरून आपल्या गळ्यातील कारवाईचा फास मोकळा करण्याच्या दृष्टीने कर्ज भरण्याची तयारी दाखवत आहेत.
“भगवान के घर देर है मगर अंधेर नही” या म्हणीचा प्रत्यय नगर अर्बन बँकेच्या बाबत निश्चित लागू पडतो कारण गेल्या अनेक दिवसांपासून बँक बचाव समिती आणि काही ठेवीदार घोटाळेबाज संचालक आणि कर्जदार यांचे विरुद्ध लढा देत आहेत मात्र सुरुवातीला अनेक संचालकांनी मजोरी दाखवत आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही अशा वल्गना केल्या होत्या मात्र आता ते संचालक पळून गेले असून त्यांना तोंड लपवण्याची वेळ आली आहे. तर जे कर्जदार अहमदनगर शहरात आहेत ते कर्जदार बँकेमध्ये कर्ज भरण्यासाठी रांगा लावत आहेत. बँकेने आता कुठे सक्त वसुली सुरू केल्याने अनेक ठिकाणी विविध कर्जदाराच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई बँकेने सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच ठेवीदारांचे पैसेही मिळतील आणि बँक सुरू होण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल पडत असल्याचं नगर अर्बन बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी सांगितले आहे.