अहमदनगर दि .२९ नोव्हेंबर-
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या ई – रजिस्ट्रेशन (सेल्फ हेल्प पोर्टल) या प्रणालीला केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व जन तक्रार विभागाच्यावतीने देण्यात येणारा मानाचा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सन्मान 2022 हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नागरिक केंद्रित सेवाप्रदायगी मधील उत्कृष्ट प्रणाली या प्रकारामध्ये सदर पुरस्कार देण्यात आला आहे. ई रजिस्ट्रेशन प्रणालीमध्ये नागरिकांना त्यांचे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये प्रत्यक्ष न जाता त्यांच्या सोयीच्या ठिकाणी घरबसल्या अथवा बिल्डरच्या कार्यालयामध्ये नोंदणी करता येतात. नागरिकांना स्वतःच्या सोयीच्या दस्ताचा मसुदा या प्रणालीमध्ये स्वतःहून समाविष्ट करून त्याचे ऑनलाईन पद्धतीने निष्पादन करून तसेच मुद्रांकाचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंट करून इ रजिस्ट्रेशन करणे शक्य झाले आहे. यामध्ये लिव अँड लायसन्सचे करारनामे तसेच नवीन फ्लॅटच्या खरेदीचे करारनामे ई रजिस्ट्रेशनद्वारे नोंदवणे शक्य आहे. आज पर्यंत सुमारे 40 लक्ष दस्तऐवज ई रजिस्ट्रेशनद्वारे नोंदवण्यात आले असून भविष्यात दरवर्षी सुमारे दहा लाख नोंदणी व्यवहार ई रजिस्ट्रेशन द्वारे करणे शक्य आहे. माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने पावन झालेल्या कटारा नगरीत झालेल्या २५ व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री कार्मिक, निवृत्तीवेतन, पंतप्रधान कार्यालय व विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र कार्यभार) ना. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी विभागाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी संगणक विभागाचे तत्कालीन उप महानिरीक्षक व अहमदनगरचे विद्यमान अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, नोंदणी विभागाचे कक्ष अधिकारी नितीन पिंपळे व सह जिल्हा निबंधक वर्ग २ संतोष हिंगाणे हेही उपस्थित होते.
सदर प्रणाली विकसित करण्यात एन आय सी, पुणे व केसीएस टेक्नॉलॉजी यांचे योगदान लाभले आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व विभागाकरिता रुपये पाच लक्ष असे पुरस्काराचे स्वरूप असून सर्व अधिकाऱ्यांना वैयक्तिक प्रशस्तीपत्रके देण्यात आली आहेत. राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागाचे अभिनंदन केले असून या प्रणालीचा बिल्डर व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. ही प्रणाली विकसित करण्यासाठी अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.