अहिल्यानगर, दि. 26 डिसेंबर
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू असून जागा वाटपाचे चित्र स्पष्ट न झाल्याने इच्छुक उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधील जागावाटपाचा तिढा बऱ्यापैकी सुटला असून काही प्रभागातील जागांवर चर्चा सुरू आहे.

तर शिंदे गटाने केडगाव मधील जागेवरून अंतर्गत कलह सुरू असून शिंदे गटातील दोन पदाधिकाऱ्यांनी महायुतीला डावलून थेट केडगाव मधील कोतकर गटाशी जवळीक साधली असून बुधवारी रात्री कोतकर गटातील प्रमुखांची भेट घेऊन केडगाव सह शहरातील काही प्रभागा बाबत चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शिंदे गट ऐनवेळी आपली चूल कोतकर यांच्या सह वेगळी मांडू शकतो अशी चर्चा सुरू आहे.
नेप्ती रोडवरील एका नेत्याच्या फार्म हाऊस वर झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकीची वेगळीच रणनीती ठरत असून त्यामुळे शिंदे गट वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे तर यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो.





