अहिल्यानगर दिनांक 14 नोव्हेंबर
अहिल्या नगर शहरात सध्या महानगरपालिकेने नो पार्किंग झोन ठरवून दिलेले आहेत. या ठिकाणी चार चाकी दुचाकी वाहन पार्किंग केल्यास दंड वसुलीसाठी खाजगी कंपनीला ठेका दिला आहे. मात्र खाजगी कंपनीचे कर्मचारी नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करत असल्याचा आरोप आता सामान्य नगरकर करू लागले आहेत. दुचाकी वाहनांना पाचशे ते आठशे रुपये तर चार चाकी वाहनांना हजार रुपयांच्या पुढे दंड भरावा लागतो ही वस्तुस्थिती असल्याचं दंड भरलेल्या नागरिकांनी सांगितले आहे.

जर एखादा माणूस दहा रुपयाचा चहा घेण्यासाठी दुकानात गेला आणि त्याची गाडी नो पार्किंग मध्ये असल्याचे सांगून कर्मचारी उचलून घेऊन गेले तर त्याला तो चहा सात ते आठशे रुपयांना पडतो अशी वेळ अनेक नगरकरांवर आली आहे. अनेक ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावलेले नाहीत. रस्त्यावर सम विषम तारखेला कुठे पार्किंग करायची याबाबत सूचना दिलेल्या नाहीत. तसेच रस्त्यावर पांढरे पट्टे मारलेले दिसत नाहीत. या सर्व प्रकार पाहता हा ठेकेदार कंपनीचा मनमानी कारभार असून फक्त पैसे वसुली करणे एवढेच टार्गेट त्यांच्यासमोर आहे असे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे दवाखाने आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा नो पार्किंग झोन करून ठेवला असल्यामुळे दवाखान्यात येणारा पेशंट आणि पोलीस स्टेशनमध्ये येणारा तक्रारदार यांना सुरुवातीला पार्किंगचे पैसे भरूनच पोलीस स्टेशनमध्ये अथवा दवाखान्यात प्रवेश करावा लागतो त्यामुळे आधीच परेशान झालेला नागरिक या पार्किंग झोनच्या पावती मुळे अजूनच परेशान होतो.
ठेकेदार कंपनीने सर्वच ठिकाणी महिला पैसे वसुलीसाठी ठेवल्या असल्यामुळे अनेक ठिकाणी वाद होतात. मात्र महिला असल्यामुळे पुरुष काहीच करू शकत नाही. मात्र आता या गोष्टीचा उद्रेक होऊ लागला असून अनेक नागरिक आणि व्यापारी याबाबत आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत. कारण या दंड वसुलीमुळे अनेक दुकानांमध्ये गिऱ्हाईक येणे कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. दोनशे रुपयाची वस्तू घ्यायची आणि हजार रुपये दंडभराच्या अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेक ठिकाणी व्यापारावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
याबाबत युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी नेता सुभाष चौकात परिसरात या दंड वसुली बाबत ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विक्रम राठोड यांच्या विरोधात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे. तर याबाबत विक्रम राठोड यांनीही नागरिकांकडून बेकायदेशीरपणे खंडणी वसुलीचा प्रकार सुरू असल्याची तक्रार केल्याची माहिती समोर आली असून या अनियंत्रित कारभाराला नगरकर वैतागून गेले आहेत.




