अहिल्यानगर दिनांक 12 जानेवारी
अवजड वाहतूक करणारे वाहन चालक जुन्या मोटर वाहन कायद्याप्रमाणे दंडाची रक्कम कमी असलेली पाहून अनेक वाहनधारक सर्रासपणे नियमांना फाटा देत वाहतूक (Transport) करीत होते. मात्र शासनाने वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी सुधारित मोटर वाहन कायदा आणला असून एक डिसेंबर 2019 पासूनच या मोटर वाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे.सूट दिलेल्या वजनापेक्षा अधिक वाहनात वजन आढळून आल्यास थेट 40 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो. मात्र तरीही अजूनही अवजड वाहतूक म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त क्षमतेने माल घेऊन जाणारी वाहतूक सुरूच आहे ही वाहतूक सुरळीत ठेवण्याकरता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काही ठराविक एजंट कार्यरत आहेत. यांच्यामार्फतच ही साखळी संपूर्ण महाराष्ट्रात योग्य नियोजन आणि आर्थिक देवाण-घेवाण करून अवजड वाहतूक सुरू ठेवण्याचे काम करत आहेत.
अहिल्यानगर शहर हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मध्य ठिकाणावर असल्यामुळे अहिल्यानगर शहरातून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा सर्वच भागात मालवाहतूक गाड्या प्रवास करत असतात यातील ओव्हरलोड गाड्या मार्गस्थ करण्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम खाजगी एजंटामार्फत आरटीओ अधिकाऱ्यांना दिली जाते आणि त्यामुळे या ओव्हरलोड गाड्या राजरोस प्रवास करत असतात.
नगर शहरातून ओव्हरलोड गाडी पास (मार्गस्थ होण्याकरता) होण्याकरता 10 आणि 12 टायर असलेल्या गाडीला अडीच हजार रुपये तर भले मोठे कंटेनेरची ओव्हरलोड ची वाहतूक करण्यासाठी दर महिन्याला तीन हजार रुपये मोजावे लागतात. दर महिन्याच्या आठ तारखेपर्यंत पैसे आणि गाडी नंबर खाजगी एजंट कडे जमा करावा लागतो आणि त्यानंतर दहा तारखेपासून हा प्रवास सुरू होतो. मात्र जर आठ तारखेला पैसे आणि गाडी नंबर एजंट मार्फत दिला नाही तर त्या गाडीवर आरटीओ अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाते. सोशल मीडियावर सध्या नगर शहरातील आरटीओ बाबत एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिप मधून आरटीओ मधील खाजगी एजंट तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकाची बातचीत आहे नगर शहरातून ओव्हरलोड वाहन मार्गस्थ करण्यासाठीची पैशांची डिमांड यातून समोर येते आहे.
क्षमतेपेक्षा जास्त माल ट्रकमध्ये भरल्याने रस्त्यांची दुर्दशा होते मात्र तरीही ओव्हरलोड ट्रक चालक रस्त्याने प्रवास करत असतात आणि त्यांना प्रोत्साहन देणारे खाजगी एजंट आणि त्यांना पाठीशी घालणारे काही ठराविक अधिकारी यांच्यामुळे ही साखळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. असा आरोप माथाडी मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. या साखळीच्या माध्यमातून दर महिन्याला लाखो करोडो रुपयांचा महसूल काही ठराविक अधिकाऱ्यांच्या खिशात जातो या साखळीला रोखण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेले मात्र ही साखळी तुटू शकत नाही अनेक खाजगी एजंट या साखळीच्या माध्यमातून गब्बर झाले आहेत.
तोंडाला रक्त लागल्याप्रमाणे कार्ड सिस्टमचे रक्त तोंडाला लागल्यामुळे काही एजंट काहीही करून हे कार्ड बंद होऊ देत नाही. वेळप्रसंगी भाव कमी जास्त केला जातो मात्र कार्ड बंद होता कामानये यासाठी हे एजंट काहीही करण्यास तयार होतात त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करून कधी आर्थिक देवाणघान करून तर अजून काही प्रयोग करून ही कार्ड सिस्टीम चालू ठेवण्याचा हातखंडा नगर शहरातील काही एजंटांकडे आहे.
नगर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीबाबत मखरे बहुउद्देशीय वाहतूक चालक-मालक माथाडी मंडळ यांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दोन नगर शहरातून सुरू असणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करावी असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे या माथाडी मंडळाने नगर शहरातून जाणाऱ्या अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नंबर जाहीर केले आहेत तसेच नगर शहरातील अधिकारी सगरे ,चौधरी, पाटील, यांना सोशल मीडियावरून या यादीही पाठवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नगर परिवहन कार्यातील अधिकारी या ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करतील का ? याकडे लक्ष लागले आहे. तसेच खाजगी एजंटामार्फत नगर शहरातील परिवहन कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माथाडी मंडळाच्या वतीने उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.