अहिल्यानगर दिनांक 4 एप्रिल
बनावट दस्त नोंदणी, खोटी कागदपत्रे सादर करत नगरच्या पोलिस कर्मचाऱ्यानेच न्यायालयाची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी आता तिघा जणांवर भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्रुबा यादव नरोटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस कर्मचारी नरेश विष्णूपंत कोडम, त्यांची पत्नी जयश्री नरेश कोडम, रुपेश प्रकाश कोडम या तिघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्रुबा नरोटे यांची लक्ष्मीनगर येथे तीन गुंठे जागा असून त्यांनी ती एका बांधकाम व्यावसायिकाला विकसित करण्यासाठी दिली होती. मात्र काही कारणाने त्यांचा करार त्यांनी सहमतीने रद्द केला होता. सदर मिळकत गिळंकृत करण्यासाठी नरेश कोडम याने बनावट दस्त तयार केला. त्यावर साक्षीदार म्हणून त्याची पत्नी जयश्री कोडम आणि रुपेश कोडम असल्याचे दाखवून सदर खोट्या कागद पत्रांच्या आधारे नगरच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्यास फिर्यादी अश्रुबा नरोटे यांनी हरकत घेतली.
हा दावा न्यायालयात सुरु असताना फिर्यादी नरोटे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये विविध प्रकारची माहिती मिळवली. आणि नोंदविण्यात आलेला दस्त कसा बनावट आहे. याचे पुरावे फिर्यादी अश्रुबा नरोटे यांनी दिवाणी न्यायालयात सादर केले. तसेच न्यायालयाची फसवणूक करत आपली मालमत्ता ताबा मारून फुकट बळकावण्याचा क प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून दिले. फिर्यादी नरोटे यांचे साक्षी पुरावे ग्राह्य धरून अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी तीन आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश भिंगार कॅम्प पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तिघा आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.