अहिल्यानगर दिनांक १३ ऑगस्ट
शहरच्या बुरुडगाव या उपनगरात मानवी हक्कांची पायमल्ली करणारा वेठबिगारीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गाईच्या गोठ्यात काम करण्यासाठी डांबून ठेवलेल्या तिघांची सुटका करून दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जाकीश बबड्या काळे आणि किशोर चव्हाण हे दोघे मिळून सुमारे दोन वर्षांपासून काही मजुरांना त्यांच्या राहत्या घरी गाईच्या गोठ्यात ठेवून जबरदस्तीने काम करवून घेत आहेत अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तत्काळ काळे यांच्या घरावर छापा टाकला. तपासणीदरम्यान गाईच्या गोठ्यात काम करण्यासाठी डांबून ठेवलेले कृष्णाराम रंगनाथ (उत्तर प्रदेश), फारूक शेख (नागपूर) आणि बाबूजी सुजरबल्ली (उत्तर प्रदेश) हे तिघे मजूर आढळून आले.सदर मजुरांना कोणतेही बाहेर जाण्याची परवानगी न देता, गेल्या एक वर्षांपेक्षा अधिक काळ जबरदस्तीने गाईंची देखभाल करण्याचे काम करवून घेत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तात्काळ तिघांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

या कारवाईत जाकीश बबड्या काळे याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा सहकारी किशोर चव्हाण हा घटनेनंतर फरार झाला आहे….





