अहिल्यानगर दिनांक 12 डिसेंबर
मोकळ्या प्लॉटवर अथवा मोकळ्या शेतीवर ताबा (Forcible possession)मारण्याचे प्रकार अजूनही सुरूच असून नगर तालुक्यातील वाटेफळ या गावात काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी एका व्यापाऱ्याच्या शेतीवर बळजबरीने ताबा मारला असून त्या व्यापाऱ्याला शेतात जाण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ताब्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी आता व्यापारी वर्गातून होत आहे.
संतोष फुलचंद गांधी यांची वाटेफळ गावात गट नं. ६० मध्ये शेती असून या शेतीमध्ये पाच डिसेंबर रोजी काही अज्ञात महिला व पुरुषांनी शेतावर ताबा मारला या महिला आणि पुरुषांनी शेतात थेट आपले पाल (झोपडी)ठोकून तेथे आपला संसार थाटला आहे. विशेष म्हणजे या महिला आणि पुरुषांनी संतोष गांधी यांना स्वतःच्याच शेतात जाण्यासाठी मज्जाव केला असून संतोष गांधी यांचा शेतामध्ये गोठा असून त्या गोठ्यात दूध दुभते जनावरे आहेत. मात्र या जनावरांना चारा देण्यासाठी ही ताबा मारलेली मंडळी संतोष गांधी यांना जाऊ देत नसल्यामुळे गोठ्यामध्ये बांधलेल्या जनावरांचाही मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत रुईछत्तीसी येथील ग्रामस्थांनी तसेच वाटेफळ येथील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि नगर तालुका पोलीस स्टेशनला निवेदन देऊन संतोष गांधी यांच्या शेतीमध्ये घुसलेल्या लोकांनाही या ठिकाणी कोणी कधी पाहिलेले नाही असे असताना परस्पर त्यांनी संतोष गांधी यांच्या शेतात पाल ठोकून ताबा मारला आहे. या लोकांवर कायदेशीर कारवाई करून शेतातून बाहेर काढावे अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.
या प्रकरणी संतोष गांधी यांनी सहा डिसेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीही अद्याप संतोष गांधी यांच्या शेतामधील पाल ठोकून ताबा मारलेल्या मंडळींनी कोणालाही न जुमानता तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारामुळे व्यापारीवर्ग धास्तावला आहे. या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेऊन असे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत यावर प्रतिबंध आणण्यासाठी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता व्यापारी वर्गातून पुढे येत आहे.
शेतीमध्ये ताबा मारून बसलेले महिला आणि पुरुष असल्याने त्या ठिकाणी शेती मधील ताबा काढण्यासाठी आणि बळजबरीने शेतात घुसलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी गेलेल्या संतोष गांधी व त्यांचे कुटुंब गेले असताना घुसकोर लोकांनीच शिवगाळ करून उलट गांधी कुटुंबीयांना त्यांच्या शेतातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडला आहे.