अहिल्यानगर : शिर्डी येथील तात्या पाटील कोते यांच्या आई बायजाबाई आणि श्री संत साईबाबा यांचे आई-मुलाच्या नात्याचा प्रसंग सांगत असताना उपस्थित भाविक भक्त तल्लीन झाले. आई-मुलाचे एकमेकांवर असलेले प्रेम, आपुलकी अनुभवण्याची संधी भाविकांना मिळाली. श्री संत साईबाबा यांनी बायजाबाईंना आपली आई मानली होती, तर बायजाबाई साईबाबांना देवच मानत होत्या. श्री संत साईबाबा हे कुठेही तपस्या करत असत, ते उपाशी राहू नयेत म्हणून बायजाबाई त्यांना नित्यनेमाने शोधायच्या व त्यांना भाकर खाऊ घालायच्या. “माझा देव उपाशी राहू नये” याची काळजी त्या घेत असत. श्री संत साईबाबा यांनी सर्वप्रथम शिर्डीत रामनवमी उत्सव सुरू केला. त्या माध्यमातून समाजामध्ये अध्यात्मिक धार्मिकतेचा व श्रद्धा-सबुरीचा संदेश रुजवला. या परंपरेतून आजही भाविकांना मार्गदर्शन मिळते. संगीतमय साई चरित्र कथेच्या माध्यमातून ॲड. धनंजय जाधव यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिरामधील धार्मिकतेचे आणि आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्माण केल्याचे प्रतिपादन ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी केले.

साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि ॲड. धनंजय जाधव मित्र मंडळाच्या वतीने संगीतमय साई चरित्र कथेचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न झाला. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिपक दातीर, भाजपचे सरचिटणीस निखिल वारे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कोतोरे, प्रेस क्लब चे अध्यक्ष विठ्ठल लांडगे, सीए ज्ञानेश कुलकर्णी, श्रीराम जोशी, सुदाम देशमुख, राम नळकांडे, अशोक झोटींग, सुभाष चिंधे, विजय सांगळे, ललेश बारगजे, कुणाल जायकर, सुशील थोरात, राजेंद्र येंडे, श्रीनिवास सामल, महेश कांबळे, अमोल भांबरकर आदी पत्रकार बांधव तसेच प्रणित हजारे, दिपक पटारे, रविंद्र लवांडे, उद्योजक अभिजीत बोरुडे, मनोज खेडकर, सचिन ओस्तवाल, निखिल लुणिया, आदित्य गुजराथी, प्रताप काळे, विकी कुमावत, नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, रुपालीताई वारे, राजुमामा जाधव, दिनानाथ जाघव, चैतन्य जाधव, अभिमन्यु जाधव यांच्या हस्ते साईबाबांची महाआरती संपन्न झाली.
या संगीतमय साई चरित्र कथेच्या तिसऱ्या दिवसाचा एक विशेष क्षण म्हणजे साईबाबांची महाआरती हा होता. या महाआरतीस उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांना मानाचा मान देत त्यांच्या हस्ते आरती पार पडली. समाजातील घटना, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यांचा प्रचार प्रसार करणाऱ्या पत्रकार बांधवांचा अशा पद्धतीने सन्मान करण्यात येणे ही अभिमानाची बाब असल्याचे भाविकांनी सांगितले. महाआरतीदरम्यान संपूर्ण परिसर “अनंत कोटी ब्रह्मांड नायक… श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय” या गजराने दुमदुमून गेला. भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि साईनाथांच्या जयघोषात सहभाग घेत महाआरतीचा सोहळा संस्मरणीय केला.
बंधन लॅान येथे संत दासगणू नगरीत सुरू असलेल्या संगीतमय साई चरित्र कथेचा तिसरा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. समाधान महाराजांच्या अमृतवाणीतून साईबाबांचा जीवनपट उलगडत असताना शेकडो भाविक तल्लीन झाले. महाआरतीनंतर भाविकांनी “अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय” अशा जयघोषात सहभाग घेतला. आयोजक ॲड. धनंजय जाधव यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व भाविकांचे आभार मानले व तेसेच भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.