अहमदनगर दि.२१ जुलै-
कापड व्यावसायिकाला दुकानाचा ताबा घेण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत दहा टक्के व्याज दराने अवैध वसुली करणाऱ्या सावकारावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य रामचंद्र सारडा (वय ४२, रा.कोठी रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकाराची माहिती मिळतात कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कारवाई केली.
योगेश अशोक गव्हाणे (रा. सोनेवाडी, केडगाव) असे व्यावसायिकाला धमकावणाऱ्या व दुकानाचा ताबा घेण्याची धमकी देणाऱ्या सावकाराचे नाव असून, त्याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आदित्य रामचंद्र सारडा यांनी योगेश अशोक गव्हाणे याच्याकडून व्याजाने दीड लाख रुपये शंभर रुपयांच्या बॉण्डवर नोटरी करून घेतले होते. नोटरी वर दहा टक्के व्याजाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर सारडा यांनी व्याजाचे गव्हाणे याला आतापर्यंत ९० हजार रुपये परत केले होते. बुधवारी दुकानाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना युवराज अशोक गव्हाणे हा सारडा यांच्या दुकानात जबरदस्तीने घुसला व शिवीगाळ करुन दुकानात सुरू असलेले दुरुस्तीचे काम बंद करण्यास सांगितले. दहा टक्के व्याजासह दोन लाख ६० हजार रुपये दिले नाही तर दुकानाला लॉक लावुन दुकान बंद करुन दुकानाचा ताबा घेतो व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकतो अशी अशी धमकी दिली. कोतवाली चे पोलीस निरीक्षक यांनी या घटनेची माहिती मिळताच गव्हाणे याची कसून चौकशी केली. त्याच्याकडे सावकारकी करण्याचा कोणताही परवाना नसताना तो अवैधरित्या दहा टक्के व्याजाने वसुली करून नागरिकांना धमकावत असल्याचे लक्षात आले. आदित्य रामचंद्र सारडा यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम ४४७, ५०४, ५०६, ५११ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध सावकारीवर कारवाई होणार :
चंद्रशेखर यादव
नागरिकांनी बँका पतसंस्था तसेच फायनान्स कंपन्या यामधून आर्थिक व्यवहारासाठी रक्कम घ्यावी. अवैध सावकारांकडून रक्कम घेऊ नये. अवाढव्य दराने गोरगरीब नागरिकांकडून व्याजाची रक्कम वसूल होत असल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.