अहमदनगर दि. १४ ऑगस्ट
अहमदनगर उपनगरा मधील गंगा उद्यान ते तारकपूर मार्गावर असणाऱ्या मिस्कीन मळा परिसरातील पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून आणि त्या ठिकाणी तुंबलेल्या ड्रेनेज लाईन मुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे या भागात सतत पाणी साचलेले असते आणि या साचलेल्या पाण्यामुळे रस्ते निसरडे होऊन आणि खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. मात्र महानगरपालिका एखाद्याचा जीव जाईल तोपर्यंत वाट पाहणार का असा सवाल आता उपस्थित होतोय.
कारण अनेक दिवसांपासून या ठिकाणी ड्रेनेज तुंबलेले असून ते सर्व पाणी या ठिकाणी असलेल्या छोट्या पुलावर साचत आहे. तर गंगा उद्यान ते तारकपूर पर्यंत रोडचे काम झाले आहे. मात्र पुलावरील अर्धवट काम तसेच राहिल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. आणि या ठिकाणी एका दिवसात तब्बल एकाच ठिकाणी सात लोक घसरून पडले सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र महानगरपालिका एखाद्याच्या मरणाची वाट पाहत आहे का?असा सवाल या परिसरातून जाणारे नागरिक करत आहेत. पुलावरील भागात किमान खड्डे बुजवावे आणि नंतर जेव्हा पावसाळा संपेल तेव्हा पुलाचे संपूर्ण काम करावे अशी मागणी आता या परिसरातील नागरिक करत आहेत.