मुंबई दि.२२ जून
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय बंड हे काही नवीन नाही याआधीही महाराष्ट्राने 1978 चाली असेच बंड पाहिले होते त्यावेळी वसंत दादा पाटील यांचं सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन झालं होतं आणि याचे प्रणेते होते शरद पवार.
आणीबाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्त्वात 1978 साली सरकार स्थापन झालं. रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री, तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले.
सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफुशी सुरू झाल्या. या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफुशी सुरू असतानाच, 1978 साली ऐन पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षात असलेले शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारांना घेऊन विरोधी बाकांवर जाऊन बसले आणि वसंतदादांचं सरकार कोसळलं.
परिणामी शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा केला आणि पहिल्यांदा मुख्यमंत्रीही बनले. त्यावेळी पवारांचं वय होतं 38 वर्षं.पवारांचं दुसरं बंड 1999 मध्ये घडलं. पवार तेव्हा कॉंग्रेसचे लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते.1996 पासून आलेल्या तीनही सरकारांमध्ये कॉंग्रेसला सत्तेपासून बाहेरच रहावं लागलं होतं. मार्च 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा सत्तेत आलेलं ‘एनडीए’चं सरकार जयललितांनी पाठिंबा काढल्यानं एका मतानं पडलं आणि त्यानंतर कॉंग्रेसमधल्या नाट्याला सुरुवात झाली. या नाट्याच्या केंद्रस्थानी होते शरद पवार.
वाजपेयी सरकार जाण्याच्या एक वर्ष अगोदर 1998 मध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्षा बनलेल्या सोनिया गांधींनी सरकार स्थापनेचा दावा केला. पण मुलायमसिंह यादवांनी सोनियांच्या विदेशी असण्याच्या मुद्दा पुढे करत कॉंग्रेसला पाठिंबा देण्याचं नाकारलं. पण सोनियांना विरोध हा केवळ कॉंग्रेसबाहेरूनच होणार नव्हता.कॉंग्रेसमध्ये भूकंप होण्यासाठीही हाच मुद्दा कारणीभूत ठरणार होता. तो भूकंप शरद पवारांनी घडवून आणला. त्यांनी सोनियांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेला आक्षेप घेतला, स्पष्ट विरोध केला. पवार कॉंग्रेसमध्ये मुरलेलं नेतृत्व होतं. सहाजिक होतं की त्यांच्यासोबत त्यांनी अजून काही दिग्गजांची मोट बांधली.
15 मे 1999 या दिवशी झालेल्या कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत पवारांच्या साथीनं पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनीही प्रधानपदी भारतात नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या व्यक्तीनेच विराजमान व्हावे अशी भूमिका घेतली होती आणि त्या नंतर शरद पवारांसह पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांचे काँग्रेस मधून निलंबन झाले होते.
ज्या 1999 सालानं शरद पवारांना बंडानंतर कॉंग्रेसनं निलंबित करतांना पाहिलं होतं, त्या 1999 सालानेच त्या शरद पवारांच्या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कॉंग्रेसनं आघाडी करून सरकार स्थापन करतांनाही पाहिलं.