अहमदनगर दिनांक 28 जुलै
लोकसभेनंतर आता सर्वांनाच वेध लागले आहे ती विधानसभा निवडणुकीचे मात्र मध्यंतरी झालेल्या राज्यातील राजकीय घडामोडीनंतर आता विधानसभेला कोण कोणाच्या विरुद्ध लढणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी तर भाजपा,शिवसेना एकनाथ शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती अस्तित्वात आली आहे. मात्र विधानसभेत आता कसं गणित राहणार हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी मधील सर्वच इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
अहमदनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यानंतर गत दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी आपला बालेकिल्ला बनवला असून आता आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. कारण महाविकास आघाडी मधून अनेक जण इच्छुक असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सर्वात जास्त इच्छुकांची संख्या आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, विक्रम राठोड शहराध्यक्ष संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसौंदर गिरीश जाधव, दत्ता जाधव यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांचे नाव सध्या चर्चेत आहेत.
नगर शहर मतदार संघावर महाविकास आघाडी मधील पहिला दावा हा प्रामुख्याने शिवसेनेचाच असून पंचवीस वर्षे स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला होता. त्यामुळे अहमदनगर शहर विधानसभेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हक्क सांगू शकते. याबाबत श्रीगोंदा येथे खासदार संजय राऊत हे आले असताना त्यांच्याशी झालेल्या चर्चेअंती अहमदनगर शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेचाच वाटेला येणार असा शब्द संजय राऊत यांनी शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती शिवसेनेचे नगर शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली होती.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार कोणीही असो मात्र आम्ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व मिळून त्या उमेदवाराचे काम करणार अशी भूमिका सर्वच इच्छुक उमेदवारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली असून त्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सध्या नगर शहर विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागली असल्याचं दिसतंय.