अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्त्या तथा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ॲड. स्वाती जाधव यांची निवड करण्यात आली आहे. प्रथम महिला महापौर शिलाताई शिंदे यांच्या हस्ते ॲड. जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भाजपच्या कल्याणी शेलार व उषाताई भिंगारदिवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या नियुक्ती व पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी महापौर सुरेखाताई कदम, माजी नगरसेविका अश्विनीताई जाधव, वंदना कुसळकर, अश्विनी ताठे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संभाजी कदम, श्याम नलकांडे, प्रशांत गायकवाड, संजय शेंडगे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले की, शिवसेना हा महिलांना सन्मानपूर्वक संधी देणारा पक्ष आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या असून, महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या ॲड. स्वाती जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना ॲड. स्वाती जाधव म्हणाल्या की, “शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास हा माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. सामाजिक कार्य, कायदेशीर मदत आणि महिलांच्या हक्कांसाठी मी आजवर जे काम केले, त्याला पक्षाने दिलेली ही पावती आहे. जिजाऊंच्या विचारांवर चालत महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी बनविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.
आजही समाजातील अनेक महिलांना न्याय, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी राबविलेल्या लाडकी बहीणसह विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिला आघाडी सक्रिय राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





