अहिल्यानगर दिनांक २५ सप्टेंबर
अहिल्या नगर शहरात विविध ठिकाणी उच्चभ्रु परिसरात स्पा सेंटर सुरू आहेत. मात्र या स्पा सेंटरच्या नावाखाली वेगळेच काहीतरी धंदे या ठिकाणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे अनैतिक धंदे नगर शहराच्या संस्कृतीला कुठेतरी डाग लावण्याचे प्रकार असून स्पा सेंटर नावालाही यामुळे डाग लावण्याचे काम काही लोक करताना दिसून येत आहेत.

नगर मनमाड रोडवर नुकतेच “ओ..रम” नामक एक नवीन व्यापारी संकुल झाले आहे त्या ठिकाणी “वेल” नावाचे स्पा सेंटर असून या ठिकाणी खरंच स्पा सेंटरचा व्यवसाय चालतो का? हे पोलिसांनी जाऊन पाहणे गरजेचे आहे. याच इमारतीच्या मागे उच्चभ्रू सोसायटी असून नगर शहरात प्रथमच मोठ मोठे शोरुम या नवीन इमारती मध्ये आले आहेत.चांगले उच्चभ्रू नागरिक या बिल्डिंगमध्ये राहत आहेत.यामुळे या परिसराचे आणि या बिल्डिंगचे नाव खराब होत आहे. त्यामुळे या स्पा सेंटरची पोलिसांनी तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाईपलाईन रोड वरील एकविरा चौका जवळच एक स्पा सेंटर असून या ठिकाणी सुद्धा काही वेगळाच प्रकार सुरू असल्याची कुजबूज या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये असून या स्पा सेंटरच्या मालकावर राजकीय वरदहस्त असल्याने यावर कारवाई होणार नाही अशी चर्चाही या परिसरात सुरू आहे.
त्याच प्रमाणे नगर मनमाड रोड वर डोले हॉस्पिटल समोरील एका भव्य संकुलात स्पा सेंटर सुरू असून या ठिकाणी वेगळाच प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
यासह पोस्ट ऑफिस एसबीआय चौक परिसरामध्ये सध्या स्पा सेंटर सुरू आहेत. मात्र यापैकी काही ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू असून यामुळे तरुण पिढी बरबाद तर होतच आहेच त्याचबरोबर जे स्पा सेंटर नियम अटी पाळून स्पा चालवत आहेत त्यांचे नावही खराब होत आहे.
याबाबत पोलिसांनी स्पा आणि मसाज सेंटर चालकांना ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करावे आणि दर आठवड्याला या ठिकाणी अचानक जाऊन तपासणी करावी म्हणजे सत्य काय ते समोर येऊ शकते.
स्पा सेंटर साठी सरकारने काही नियम बनवले आहेत त्या नियम अटींचा नगर शहरातील स्पा सेंटरमध्ये पालन होते का ?
स्पा आणि मसाज सेंटरच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या लैंगिक क्रियाकलापांमध्ये गुंतणे प्रतिबंधित आहे.
पुरुषांसाठी फक्त पुरुषच मालिश करतील आणि महिला महिलांसाठी मालिश करतील.
या केंद्रात पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे प्रवेशद्वार असतील.
मध्यभागी स्वतः बंद होणारे दरवाजे असणे अनिवार्य आहे.
मसाज/स्पा सेंटरना कामकाजाच्या वेळेत बाहेरील दरवाजे उघडे ठेवणे बंधनकारक असेल.
केंद्रात येणाऱ्या सर्व ग्राहकांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. फोन नंबर आणि त्यांचे तपशील पुराव्यासह रजिस्टरमध्ये प्रविष्ट करावे लागतील.
स्पा/मसाज सेंटर फक्त सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेतच उघडे राहू शकतात आणि प्रत्येक खोलीत योग्य प्रकाश व्यवस्था करावी.
स्पा/मसाज सेंटरचा परिसर निवासी कारणांसाठी वापरला जाणार नाही.
केंद्रात काम करणाऱ्यांकडे फिजिओथेरपी/अॅक्युप्रेशर किंवा व्यावसायिक थेरपीमध्ये पदवी/डिप्लोमा/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
केंद्राला हाऊसकीपिंग स्टाफसह सर्व कर्मचाऱ्यांची माहिती एका रजिस्टरमध्ये ठेवावी लागेल.
या व्यवसायासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
स्पा/मसाज सेंटरला आरोग्य व्यापार परवाना जारी करण्यापूर्वी स्थानिक संस्था परिसराची पडताळणी करेल तसेच स्पा/मसाज सेंटरच्या मालकाची/व्यवस्थापकाची पोलिस पडताळणी करेल.
या सर्व नियम अटी पाळल्या जातात का ? पोलीस पडताळणी झाली का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.





