अहमदनगर दि.२७ ऑक्टोबर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवरील फोटोबाबत केलेलं विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. नोटेवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केजरीवाल यांनी केली आहे. यानंतर आता यावरुन बरेच वाद-विवाद सुरु झाले आहे. अनेक नेत्यांनी ट्विटरवर या फोटोबाबत वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा असं म्हटलं आहे. अशा नोटेचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
याबाबत भाजपचे आमदार राम कदम यांनी मोदींचा फोटो नोटेवर असावा अशी मागणी केली तर काँग्रेसच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नोटांवर असावा अशी मागणी केली असून. या फोटोवरून सध्या राज्यात चांगलंच राजकारण पेटल आहे. याबाबत अहमदनगर जिल्ह्याचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आपले मत मांडताना सांगितले की नोटांवर सध्या जो फोटो आहे तो चांगलाच आहे त्या बाबत कोणाचे काय मत आहे ते वैयक्तीक आहे. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मध्ये दारू ठेका वाटताना केलेला भ्रष्टाचार आणि पंजाब मध्ये आप मुख्यमंत्र्यांना लोकांचे प्रश्न सोडता न आल्यामुळे होत असलेली टीका या सर्व गोष्टी लपवून वेगळेच कुठेतरी लोकांना भरकटत न्यायचं आहे. म्हणून त्यांनी तसं वक्तव्य केले असेल मात्र उद्या मलाही असे वाटते की माझा फोटो नोटेवर असावा मात्र देशात नोटेवर फोटो असण्यापेक्षा ती नोट नागरिकांच्या खिशात कशी जाईल याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे प्रत्येकाला चांगले दिवस आले असल्याचेही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलय.